भाईंदरमध्ये रिक्षा चालकांची दांडगाई; रस्त्यात रिक्षा उभ्या केल्यास कारवाईचा इशारा दिला म्हणून रिक्षा चालकांचा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 09:15 PM2023-06-23T21:15:14+5:302023-06-23T21:15:33+5:30
भाईंदर पश्चिमेस बालाजी नगर येथे रेल्वे स्थानक जवळ रिक्षा उभ्या केल्या जातात. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटना व रिक्षा चालकांची बैठक घेऊन केवळ १० रिक्षा उभ्या करायच्या आणि अरुंद रस्त्यात रिक्षा उभ्या करायच्या नाहीत, असे वेळोवेळी सांगितले आहे.
मीरारोड - अरुंद रस्त्यात मनाई करूनदेखील रिक्षा उभ्या केल्याने कारवाईचा इशारा दिला, म्हणून भाईंदरच्या रिक्षा चालकांनी शुक्रवारी अचानक रिक्षा बंद करून नागरिकांना वेठीस धरले. नंतर रस्त्यात जमून गोंधळ घालणाऱ्या रिक्षा चालकांना अखेर पोलिसांनी हुसकावून लावले.
भाईंदर पश्चिमेस बालाजी नगर येथे रेल्वे स्थानक जवळ रिक्षा उभ्या केल्या जातात. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटना व रिक्षा चालकांची बैठक घेऊन केवळ १० रिक्षा उभ्या करायच्या आणि अरुंद रस्त्यात रिक्षा उभ्या करायच्या नाहीत, असे वेळोवेळी सांगितले आहे. तरी देखील अरुंद रस्त्यात २५ ते ३५ रिक्षा उभ्या करून रिक्षा चालक रस्ता अडवतात. यामुळे बालाजी नगर मधील नागरिकांच्या गाडयांना तसेच लोकांचा चालण्यास त्रास होतो. रिक्षा चालकास सांगितल्यास ते भांडायला येतात. त्यामुळे येथील सर्व इमारतींच्या सोसायटीने व नागरिकांनी वारंवार वाहतूक पोलिसां पासून शासन व पालिकेस लेखी तक्रारी केल्या आहेत.
गुरुवारी सायंकाळी देखील रिक्षा रस्त्यात उभ्या असल्याने नागरिकांच्या तक्रारी नंतर वाहतूक पोलीस कर्मचारी व सहायक पोलीस निरीक्षक मंगेश कड हे बालाजी नगर येथे आले. त्यांनी रस्त्यात अडथळा करणाऱ्या बेकायदा लावलेल्या रिक्षा काढण्यास सांगितले. त्यावेळी पुन्हा रिक्षा चालक व संघटनांचे प्रतिनिधी जमावाने जमले आणि कारवाईचा विरोध करू लागले . येथे १० पेक्षा जास्त रिक्षा लावायच्या नाहीत व रस्त्यात रिक्षा उभ्या करू नये असे ठरले असल्याची पोलिसांनी पुन्हा आठवण करू देत रस्त्यात रिक्षा उभ्या केल्यास कारवाई करणार असे सांगितले. त्यावर रिक्षा चालक व संघटनाचे प्रतिनिधींनी पोलिसांशी हुज्जत घालत कारवाईला विरोध केला आणि रिक्षा आम्ही बंद करतो असे सांगत गुरुवारी रात्री बालाजी नगर येथील रिक्षा स्वतःच बंद केल्या.
शुक्रवारी रिक्षा चालक व संघटना यांनी भाईंदर रेल्वे स्थानक येथील रिक्षा देखील अचानक बंद केल्या. रिक्षा चालक रस्त्यात जमावाने जमले तसेच रिक्षा बंद करण्यास सांगत होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर अचानक रिक्षा बंद केल्याने सामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. रिक्षा नसल्याने वृद्ध, महिला व मुलांसह पुरुषांना नायक पायपीट करावी लागली. रिक्षा चालक बालाजी नगर येथे झुंडीने उभे असल्याने व समजावून सांगून देखील ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी आक्रमक पवित्र घेत त्यांना पिटाळून लावले. त्या ठिकाणी पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. सायंकाळी रिक्षा चालकांनी स्वतःहूनच पुन्हा रिक्षा सेवा सुरु केली.
दरम्यान अचानक रिक्षा बंद करून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या, रस्त्यात जमावाने जमून रहदारीला बाधा आणणाऱ्या रिक्षा चालक व संघटनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.