रिक्षाचालकांनी सरकारी नियमांचे बंधन पाळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:40 AM2021-04-06T04:40:05+5:302021-04-06T04:40:05+5:30
कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून राज्यात ‘मिशन ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली ...
कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून राज्यात ‘मिशन ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी कोकण विभागात कोरोना रुग्णसंख्येत दररोज वेगाने वाढ होत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे आवाहन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी रिक्षाचालकांना केले आहे.
कोरोना महामारीने देशात थैमान घातले आहे. रिक्षातून प्रवासी वाहतूक करताना मास्कचा वापर करा. तसेच नियमाप्रमाणे फक्त दोनच प्रवासी घ्या. दोनपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात घेतल्यास वाहतूक पोलीस, शहर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोनच प्रवासी घेऊन दंडात्मक कारवाई व आर्थिक नुकसान टाळा. रिक्षात ड्रायव्हर व प्रवासी यांच्यामध्ये सुरक्षा पडदा लावावा. सोशल डिस्टन्सिंगसाठी अंतर राखा, रिक्षा स्टॅण्ड येथे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, त्याचप्रमाणे ताप, सर्दी, खोकला आजार व अन्य लक्षणे वाटल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात तपासणी करून घ्या, असे आवाहन करताना पेणकर यांनी वय वर्ष ४५ असलेल्या रिक्षाचालकांनी आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लस आवर्जून घ्यावी, याकडेही लक्ष वेधले आहे.
-----------