रिक्षाचालकांचा आज रात्रीपासून बंद
By admin | Published: May 24, 2017 01:17 AM2017-05-24T01:17:57+5:302017-05-24T01:17:57+5:30
ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे बुधवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे बुधवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर आॅटो-टॅक्सी संघर्ष कृती समितीने घेतला आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर ठाणेकरांना रिक्षाखेरीज अन्य वाहतूक साधनांवर अवलंबून रहावे लागणार आहे.
रिक्षाचालकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा बंद ठेवण्यात येणार असला तरी पालिका आणि रिक्षाचालकांच्या वादात प्रवाशांना नाहक त्रास होणार आहे. रिक्षा चालकांबरोबरच फेरीवालेही संपावर जाणार असल्याचे फेरीवाला संघटनेने स्पष्ट केले आहे.
पालिका आयुक्तांनी शहरातील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर गेल्या १० ते १२ दिवसांपासून कारवाई सुरु केली आहे. ११ मे रोजी गावदेवी आणि स्टेशन परिसरात झालेल्या कारवाईच्यावेळी रिक्षा युनियनचे नेते राजू सावंत यांच्यासह काही रिक्षाचालकांना मारहाण झाली. आयुक्तांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी या बेशिस्त रिक्षा चालकांना प्रसाद दिला. यामुळे रिक्षाचालक आणि पालिका प्रशासनामध्ये संघर्ष निर्माण झाला असून पालिका आयुक्तांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय रिक्षा संघटनांनी घेतला आहे. रिक्षा बंद ठेऊन चालक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढणार आहेत. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नौपाडा येथील जय भगवान हॉलमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक अनंता सावंत यांनी दिली आहे.
ठाणे शहर घोडबंदरपासून दूरवर विस्तारले आहे. सकाळी कार्यालय गाठण्याकरिता जाताना व सायंकाळी घरी परतताना ठाणेकरांना टीएमटीच्या सेवेखेरीज केवळ रिक्षाचा पर्याय आहे. अनेकदा टीएमटीच्या बस वाहतूक कोंडीत अडकतात व परिणामी वेळेवर येत नाहीत. बसच्या तुलनेत रिक्षा ही महाग असली तरी जलद स्टेशनवर येण्याकरिता आवश्यक सेवा आहे. बुधवारी रात्रीपासून रिक्षा बंद होणार असल्याने रात्री उशिरा कार्यालयातून परतणाऱ्यांचे तसेच बाहेरगावाकडून येणाऱ्यांचे हाल होणार आहेत. गुरुवारी सकाळपासून रिक्षा रस्त्यावरुन गायब राहिल्या तर कार्यालय गाठणाऱ्यांचे हाल होणार हे निश्चित आहे.