रिक्षाचालक, दुकानदारांमध्ये तणाव
By Admin | Published: October 8, 2015 12:29 AM2015-10-08T00:29:33+5:302015-10-08T00:29:33+5:30
अंबरनाथ स्टेशन परिसरातील पूर्व आणि पश्चिम भागांत चालक हे दुकानांच्या समोरच रिक्षा उभ्या करून भाडे आकारत असल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ स्टेशन परिसरातील पूर्व आणि पश्चिम भागांत चालक हे दुकानांच्या समोरच रिक्षा उभ्या करून भाडे आकारत असल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे या दुकानदारांनी रिक्षाचालकांना दुकानासमोर रिक्षा उभ्या न करण्याचा सल्ला देताच त्यांच्यात वादावादी सुरू झाली आहे.
अंबरनाथ स्टेशन परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत असून काही रिक्षाचालक थेट रस्त्यावरच भाडे घेण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. एवढेच नव्हे तर पादचाऱ्यांना या रस्त्यावरून चालणेदेखील अवघड जात आहे. चुकीच्या पद्धतीने रिक्षा उभ्या करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने आता या त्यांच्या चालकांनी स्टेशन परिसरातील दुकानदारांच्या समोरच लांबलचक रिक्षांच्या रांगा लावून साइड भाडे घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या या प्रवृत्तीमुळे स्टेशन परिसरातील दुकानदारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे रिक्षाचालक आणि दुकानदार यांच्यात अनेक वेळा खटके उडाले आहेत. बुधवारी दुपारी या त्रासाला कंटाळून दुकानदारांनी चालकांना रिक्षा काढण्यास सांगितल्याने त्यांच्यात वादावादी सुरू झाली. वाढता तणाव लक्षात घेता वाहतूक विभागाचे सुरेश इंगळे यांनी हस्तक्षेप करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पर्यायी जागा नसल्याने रिक्षाचालकही माघार घेण्यास तयार झाले नाहीत. अखेर, हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यावर येत्या काही दिवसांत तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुसरीकडे स्टेशनकडे जाणारा रस्ता हा एकेरी वाहतुकीसाठी असतानाही रिक्षाचालक याच रस्त्यावर भाडे स्वीकारण्यासाठी कसे उभे राहतात, हा प्रश्न पालिका प्रशासन आणि वाहतूक प्रशासनाने अद्याप सोडविलेला नाही. तसेच गेल्या तीन महिन्यांत वाहतूक व्यवस्थेत बदल केल्यापासून वाद वाढले असून समस्या कायम राहिली आहे. सर्वात मोठी समस्या ही रिक्षा स्टॅण्डची असून मुख्य रिक्षा स्टॅण्डवर सर्वच रिक्षाचालक जात नसल्याने हे वाद वाढले आहेत.