रिक्षाचालकांची वाहतूक पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 05:57 AM2017-08-12T05:57:12+5:302017-08-12T05:57:12+5:30
बेशिस्त रिक्षा उभ्या करणाºया चालकांविरोधात कारवाई करणारे वाहतूक पोलीस नामदेव हिमगिरे यांना दोन रिक्षाचालकांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी कल्याणमध्ये घडली.
कल्याण : बेशिस्त रिक्षा उभ्या करणाºया चालकांविरोधात कारवाई करणारे वाहतूक पोलीस नामदेव हिमगिरे यांना दोन रिक्षाचालकांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी कल्याणमध्ये घडली. राहुल कारंडे व बाळा ठाकूर अशी या रिक्षाचालकांची नावे आहे. त्यापैकी कारंडेला पोलिसांनी अटक केली.
पश्चिमेतील मोहिंदरसिंग काबूलसिंग शाळेसमोर दोन रिक्षाचालकांनी बेशिस्तपणे रिक्षा रस्त्यात उभी केली होती. वाहतुकीस अडथळा होत असल्याने हिमगिरे व ट्रॅफिक वॉर्डन अक्षय उगले हे तेथे कारवाई करत होते. हिमगिरे यांनी त्यांचे पावती पुस्तक उघडताच रिक्षाचालकाने त्यांच्या अंगावर २०० रुपये फेकले. तसेच त्यांची कॉलर धरत त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी कारंडे याला अटक केली, ठाकूरला अटक केलेली नाही. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याण रेल्वेस्थानक परिसरात भररस्त्यात रिक्षा उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया दोन बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. ही घटना ताजी असताना रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली.
पोलीसही धावले रिक्षाचालकांच्या अंगावर?
वाहतूक पोलिसाला झालेल्या मारहाणीचा प्रकार कोणीतरी मोबाइलमध्ये चित्रित केला आहे. त्याची क्लिप व्हायरल झाली. त्यात पोलीसही रिक्षाचालकांच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसत आहे, असा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. त्यामुळे कोणी कोणाला मारले, याविषयी रिक्षाचालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.