‘रिक्षा बंद’मुळे विद्यार्थ्यांचे हाल
By Admin | Published: March 8, 2017 04:20 AM2017-03-08T04:20:33+5:302017-03-08T04:20:33+5:30
महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था व वाहतूक पोलिसांची मनमानी या विरोधात शहरातील रिक्षाचालकांनी मंगळवारी बंद पुकारला.
भिवंडी : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था व वाहतूक पोलिसांची मनमानी या विरोधात शहरातील रिक्षाचालकांनी मंगळवारी बंद पुकारला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच दहावी-बारावीच्या परीक्षार्थींचे हाल झाले.
दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. त्यातच शहरातील रिक्षाचालकांनी अचानक बंद पुकारल्याने विद्यार्थांना एक ते दोन किलोमीटर चालत जावे लागले. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मित्रांच्या दुचाकीवरुन परीक्षाकेंद्रापर्यंत गेले. तर आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रात सोडून त्याच रिक्षातून घरी परत निघालेल्या पालकांना रिक्षातून उतरवून त्या रिक्षाच्या काचा फोडल्या. काही ठराविक भागात रिक्षांची वाहतूक सुरु होती.
शहरातील रस्ते दुरुस्त करा, पालिकेच्यावतीने रिक्षातळांची फलके लावा,अतिरीक्त प्रवासी घेऊन वाहतूक करणाऱ्या प्रवासी टॅक्सीवर कारवाई करा,खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, वाहतूक पोलिसांकडून मिळणारी असभ्य वागणूक थांबवा, विनापरवाना रिक्षांवर कारवाई करा अशा
विविध मागण्यांसाठी दुपारी एक वाजता भिवंडी तालुका रिक्षा चालक-मालक महासंघाच्या वतीने जकातनाका ते प्रांत कार्यालया पर्यंत मोर्चा काढला.
या वेळी रिक्षाचालकांनी प्रशासन व वाहतूक पोलिसांविरोधात घोषणा दिल्या. प्रांत अधिकारी कार्यालयात रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. ऐन परीक्षेच्या काळात रिक्षाचालकांनी बंद पुकारल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)