रिक्षाचे स्टेअरिंग मुलांच्या हातात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:31 AM2018-08-08T03:31:08+5:302018-08-08T03:31:18+5:30

एकीकडे रिक्षाचालकांच्या मुजोरीला प्रवाशांना सामोरे जावे लागत असताना आता रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन मुलांच्या हाती गेल्याने प्रवास धोकादायक झाला आहे.

Rickshaw steering children in hand! | रिक्षाचे स्टेअरिंग मुलांच्या हातात!

रिक्षाचे स्टेअरिंग मुलांच्या हातात!

Next

- प्रशांत माने
डोंबिवली : एकीकडे रिक्षाचालकांच्या मुजोरीला प्रवाशांना सामोरे जावे लागत असताना आता रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन मुलांच्या हाती गेल्याने प्रवास धोकादायक झाला आहे. बहुतांश ठिकाणी हे चित्र दिसत असलेतरी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा याकडे होत असलेला कानाडोळा चर्चेचा विषय ठरला आहे. परवाना नसताना बेकायदा रिक्षा चालविणाऱ्या या मुलांच्या टवाळखोरीमुळे प्रवासी मेटाकुटीस आले आहेत.
कल्याण-डोंबिवलीत रिक्षांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नवीन परवाना वाटप थांबवा, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. परंतु, सरकारने परवाना देणे सुरूच ठेवल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन कोंडीत भर पडत आहे. रिक्षा परवाना घेऊनही दुसरा व्यवसाय करणारेही अनेक जण आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती रिक्षा जात असल्याचे बोलले जात आहे.
परवानाधारक रिक्षाचालकाकडे परवाना आणि बॅज बंधनकारक आहे. परंतु, काही रिक्षामालक ते नसलेल्या चालकांच्या हाती रिक्षा देत आहेत. त्यामुळे १५ ते १६ वर्षांची मुले सर्रासपणे रिक्षा चालविताना दिसत आहेत. अशांकडे गणवेश नसतो. ते बर्मुडा, हाफ पॅन्ट अशा पेहरावात रिक्षा चालवतात. स्टॅण्ड सोडून भाडे घेणे, गुटखा, मावा खाणे, मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसन, उद्धट, उर्मट वागणूक त्याचबरोबर मनमानीपणे भाडे ते आकारत असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यांच्या अशा वागणुकीमुळे सर्वसामान्य प्रामाणिक रिक्षाचालक भरडला जात आहे. तसेच रिक्षाव्यवसायही एकप्रकारे बदनाम होत आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग गेल्याने रिक्षाचा प्रवासही धोकादायक झाला आहे. २८ जूनला अशा टवाळखोर रिक्षाचालकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने प्रवाशाचे अपहरण करून त्याला लुटल्याची घटना घडली होती. त्यात प्रवाशीही जखमी झाला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नोंदही आहे. पण याउपरही अशा प्रवृत्तीला आळा घालण्याऐवजी त्याकडे आरटीओ आणि वाहतूक शाखेकडून पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
>तक्रार करूनही कानाडोळा
बेकायदा रिक्षा व्यवसाय करणाºयांविरोधात आरटीओ आणि वाहतूक शाखेकडे तक्रार केली आहे. अशा टवाळखोरांमुळे रिक्षा व्यवसायही बदनाम झाला आहे.
रिक्षांची वाढती संख्या पाहता नवीन परवाना देणे थांबवा, अशीही मागणी केली आहे. पण, त्याकडेही दुर्लक्ष केल्याचे मत कोकण रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी व्यक्त केले.
>कारवाई सुरू असल्याचा दावा : यासंदर्भात आमची कारवाई सुरू असते. मी स्वत: नुकताच दौरा करून, अशा रिक्षाचालकांवर केस दाखल केल्या आहेत. यामध्ये परवानाधारकाला एक महिन्याची निलंबन कारवाईपण आहे. याउपरही हे प्रकार सुरू असतील तर कारवाई तीव्र करावी लागेल, अशी प्रतिक्रिया आरटीओचे अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.

Web Title: Rickshaw steering children in hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.