रिक्षा-टॅक्सीची १ फेब्रुवारीपासून बेकायदा भाडेवाढ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 01:09 AM2019-01-23T01:09:24+5:302019-01-23T01:09:30+5:30
प्रलंबित रिक्षा भाडेदरवाढ विनाविलंब मिळावी, अशा मागणीचे पत्र देऊनही त्याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने १ फेब्रुवारीपासून स्वयंघोषित बेकायदा भाडेवाढ करण्याचा निर्णय कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने घेतला आहे.
कल्याण : प्रलंबित रिक्षा भाडेदरवाढ विनाविलंब मिळावी, अशा मागणीचे पत्र देऊनही त्याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने १ फेब्रुवारीपासून स्वयंघोषित बेकायदा भाडेवाढ करण्याचा निर्णय कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने घेतला आहे. यासंदर्भातील पूर्वसूचना पत्र महासंघाने परिवहन आयुक्तांना पाठविले आहे. स्वयंघोषित भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम तसेच असंतोष पसरून जर वादविवाद झाले तर त्याची जबाबदारी परिवहन प्रशासनाची राहील, असा इशारा महासंघाने दिला आहे.
सध्या रिक्षा प्रवासासाठी पहिल्या दीड किलोमीटरसाठी १८ रुपये भाडे आकारले जात आहे. त्यात वाढ करून ते २२ रुपये करावे. तर, पुढील किलोमीटरसाठी १२ रुपयांवरून १६ रुपये दरवाढ मिळावी, अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सीचालकांची आहे. महागाई निर्देशंकानुसार दरवर्षी योग्य ती भाडेदरवाढ दिली पाहिजे. पंरतु, सीएनजी गॅस दरात पाच रु पये प्रति किलो वाढ होऊनही चार वर्षे रिक्षा व टॅक्सी भाडेदरवाढ केलेली नाही, असे महासंघाचे म्हणणे आहे.
प्रचंड वाढलेली महागाई व अनेक कारणांमुळे रिक्षा-टॅक्सी व्यावसायिक त्रस्त आहेत. रिक्षा व्यवसाय अक्षरश: डबघाईला आला आहे. वारंवार मागणी करूनही परिवहन प्रशासनाकडून भाडेदरवाढीबाबत चालढकल सुरू आहे. भाडेवाढ प्रलंबित ठेवणे अन्यायकारक असून, लवकरात लवकर याबाबत अंमलबजावणी करा, अन्यथा १ फेब्रुवारीपासून दरवाढ जाहीर केली जाईल, असे महासंघाने पत्रात म्हटले आहे.
>मुख्यमंत्र्यांनाही पत्र
महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवून रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.
भाडेदरवाढ मिळावी, तसेच आॅटो रिक्षा-टॅक्सींच्या नवीन परवाने वाटपाला विनाविलंब स्थगिती द्यावी, आॅटोरिक्षा कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेची अंमलबजावणी करावी, आॅटोरिक्षा टॅक्सी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास होणाऱ्या विलंबाबाबत उपाययोजना करावी आदी मागण्या केल्या आहेत.
या सर्व बाबींवर चर्चा विनिमय करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळही मागितल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली.