कळवा येथून रिक्षा चोरणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:42+5:302021-09-08T04:48:42+5:30
ठाणे : रिक्षा चोरून पेट्रोल किंवा सीएनजी संपेपर्यंत प्रवासी भाडे घेणाऱ्या अजय आव्हाड (१८, रा. पंचवटी, नाशिक) या ...
ठाणे : रिक्षा चोरून पेट्रोल किंवा सीएनजी संपेपर्यंत प्रवासी भाडे घेणाऱ्या अजय आव्हाड (१८, रा. पंचवटी, नाशिक) या अट्टल चोरट्याला अटक केल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी मंगळवारी दिली. त्याच्याकडून आठ लाख २० हजारांच्या सात रिक्षा जप्त केल्या आहेत.
ठाण्यात रिक्षा व दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या आदेशाने रिक्षा चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी कळवा पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. आंधळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार केली होती. हवालदार एडके यांना मिळालेल्या माहितीनुसार, कळवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कानडे, उपनिरीक्षक महेश कवळे आदींच्या पथकाने सापळा लावला. यावेळी तेथे रिक्षा चोरीसाठी आलेल्या आव्हाड याला ५ सप्टेंबरला पहाटे ५ च्या सुमारास संशयावरून ताब्यात घेतले.
आव्हाड हा रिक्षा चोरल्यानंतर सीएनजी संपेपर्यंत प्रवासी घेऊन फिरवायचा. तिचे सीएनजी संपले की, पुन्हा दुसरी रिक्षा चोरत असत. अशाच प्रकारे त्याने कळवा परिसरातील पाच आणि नवी मुंबईतील रबाळे भागातून दोन, अशा सात रिक्षांची चोरी केली आहे.
केवळ मौजमजेसाठी चोऱ्या
केवळ रिक्षातून फिरण्यासाठी आणि दुसऱ्याला रिक्षा भाड्याने देऊन त्यातून मिळणाऱ्या पैशांवर मौजमजा करण्यासाठी रिक्षांची चोरी केल्याचे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले. चोरलेली रिक्षा विकणे किंवा ती भंगारात काढून पैसे मिळविणे, असाही आपला उद्देश नव्हता, असाही दावा त्याने केला आहे. त्याच्याकडून आणखीही अशाच प्रकारे चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
----------------