रिक्षा युनियनचा अॅपला सक्त विरोध
By admin | Published: July 16, 2017 02:54 AM2017-07-16T02:54:46+5:302017-07-16T02:54:46+5:30
ओला आणि उबेरच्या धर्तीवर प्रवाशांना आॅनलाइन रिक्षा बुक करता येईल, असे अॅप महापालिका तयार करीत आहे. या अॅपमुळे शहरात अधिकृत रिक्षा किती आहेत, हे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ओला आणि उबेरच्या धर्तीवर प्रवाशांना आॅनलाइन रिक्षा बुक करता येईल, असे अॅप महापालिका तयार करीत आहे. या अॅपमुळे शहरात अधिकृत रिक्षा किती आहेत, हे उघड होणार असून यामुळे अनधिकृत रिक्षांचा गोरखधंदा बंद होणार आहे. त्यामुळे या अनधिकृत रिक्षांच्या धंद्यावर गब्बर झालेल्या काही युनियनवाल्यांनीच या अॅपला विरोध करून काही झाले तरी ते सुरू होऊ न देण्याचा इशारा दिला आहे.
ओला आणि उबेरच्या धर्तीवर सुरू करण्यात येणाऱ्या या अॅपविषयी सोमवारी महापालिका आयुक्तांसमोर सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, ते रिक्षा युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलून अंतिम करणार असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. येत्या एक आठवड्यात ते अंतिम करण्यात येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. या अॅपमुळे महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी तर मिळणार आहेच, शिवाय अधिकृत आणि अनधिकृत रिक्षा किती आहेत, हे समजणार आहे.
मागील काही दिवसांत पुन्हा काही विक्षिप्त रिक्षाचालकांकडून महिलांबरोबर गैरवर्तणुकीचे प्रकार वाढले आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून विविध उपाय केले जात आहेत. या प्रकारांना आळा बसावा, म्हणून महापालिकेनही मदतीचा हात पुढे केला होता. रिक्षाचालकांची नोंदणी अत्यावश्यक ठरवून ओला-उबेरप्रमाणे दूरध्वनीवरून रिक्षा बोलवण्याचे अॅप सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, काही रिक्षाचालकांच्या हेकेखोर युनियनवाल्यांनी या अॅपला विरोध केला आहे. परंतु, तरीही आयुक्तांनी ते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे पुन्हा काही रिक्षा युनियनवाल्यांनी हे अॅप रिक्षाचालकांसाठी धोक्याची घंटा असल्याचा गवागवा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या अॅपमुळे अनधिकृत रिक्षांना चाप बसून त्या जवळजवळ बंद होणार आहेत.