काळू नदीवरील धोकादायक पूल स्फोटकांच्या साहाय्याने जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:15 AM2018-12-05T00:15:00+5:302018-12-05T00:15:07+5:30
मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांना जोडणारा लेनाड गावाजवळील काळू नदीवरील पूल प्रवासासाठी धोकादायक व मोडकळीस आल्याने तो अखेर सोमवारी स्फोटकांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला.
किन्हवली : मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांना जोडणारा लेनाड गावाजवळील काळू नदीवरील पूल प्रवासासाठी धोकादायक व मोडकळीस आल्याने तो अखेर सोमवारी स्फोटकांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला. दोन वर्षांपासून या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.
मुरबाड-शहापूर लेनाड मार्गे होणारी बस वाहतूक आणि अवजड वाहनांची वाहतूकही दोन वर्षांपासून बंद होती. त्यामुळे मुरबाड-सरळगाव मार्गे चाळीस किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास आणि त्यापोटी वाढीव भाड्याचा भुर्दंड प्रवाशांना
सोसावा लागत होता. लेनाडजवळील काळू नदीवरील पूल बंद केल्यानंतरही कामासाठी निधीच उपलब्ध
नसल्याने कामाचा खोळंबा झाला होता. शहापूरचे आमदार पांडुरंग
बरोरा यांनी या पुलाच्या औचित्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात
मांडला. पुलाच्या नूतनीकरणाचा प्रश्न लावून धरून यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे सोमवारी हा पूल स्फोटकांच्या साहाय्याने तोडण्यात आला आहे. पावसाळ्यापर्यंत हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.