शिवसेना, राष्ट्रवादीमधील खटके दोन्ही पक्षांना महापालिका निवडणुकीत पडणार महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:23+5:302021-08-20T04:46:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कारभार हाकला जात असताना ठाण्याच्या महाविकास आघाडीत मात्र मागील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कारभार हाकला जात असताना ठाण्याच्या महाविकास आघाडीत मात्र मागील काही दिवसांपासून एकामागून एक ठिणगी पडताना दिसत आहे. नरेश म्हस्के हे राष्ट्रवादीमुळेच महापौर झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केल्यानंतर आता म्हस्के यांनीदेखील पलटवार करीत परांजपे यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत वारंवार उडणाऱ्या या खटक्य़ांमुळे ठाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. अशीच परिस्थिती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत राहिल्यास त्याचा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी विविध मुद्द्यांवर आंदोलन केले असता, आम्हाला तुमची गरज नाही, महानगरपालिकेत आमची एकहाती सत्ता आहे, असे प्रतिपादन महापौर म्हस्के यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे परांजपे यांनी राष्ट्रवादीमुळेच महापौर पद मिळाल्याची म्हस्के यांना जाणीव करून दिली. परांजपे यांच्यावर पलटवार करताना म्हस्के म्हणाले की, वास्ताविक पाहता परांजपे यांनी स्वत:च विस्मरण या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे. सध्याचे राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला त्यावेळी म्हणाले की, आगामी काळात राज्यात आघाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेमध्येदेखील आपण आघाडी करण्याचा एक पायंडा पाडू, असे त्यावेळी मुल्ला यांनी आपणास म्हटल्याचा दावा म्हस्के यांनी केला. आमच्या पक्षाचे पूर्ण संख्याबळ होते. परंतु, राष्ट्रवादीने बिनविरोध महापौर निवडून देण्याची भूमिका घेतली व आम्हीदेखील त्याला सहमती दर्शविली. गेल्या १५-२० वर्षांत राष्ट्रवादीला कधीही विशेष समिती मिळाली नव्हती. मात्र, शिवसेनेने महिला व बालकल्याणसारखी महत्त्वाची समिती दिली. वास्तविक या समितीवर शिवसेनेचा सभापती बिनविरोध सहज येऊ शकला असता. शहरातील एका प्रभाग समितीतही आम्ही त्यांना बिनविरोध निवडून दिले. याशिवाय परिवहन समितीचे एक सदस्यपदही दिल्याचे स्मरण म्हस्के यांनी यानिमित्ताने करून दिले.
(जोड बातमी आहे)