शिवसेना, राष्ट्रवादीमधील खटके दोन्ही पक्षांना महापालिका निवडणुकीत पडणार महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:25+5:302021-08-20T04:46:25+5:30
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचे उघडउघड दिसत आहे. विरोधी पक्षनेते शानू पठाण एक भूमिका घेताना, ...
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये दोन गट असल्याचे उघडउघड दिसत आहे. विरोधी पक्षनेते शानू पठाण एक भूमिका घेताना, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक नजीब मुल्ला हे आघाडीचा धर्म पाळताना दिसत आहेत. भाजपने शानू पठाण यांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करून आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्नही केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे ग्लोबल हॉस्पिटलला भेट देण्यासाठी गेले असता पठाण हेदेखील हजर राहिल्याने, त्याचा रागही महाविकास आघाडीतील नगरसेवकांना आला आहे. त्यामुळे महासभेत राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांसह कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी पठाण यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातही पठाण हे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक मानले जात असून त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानेही राष्ट्रवादीचा दुसरा गट नाराज आहे. त्यामुळेच पठाण यांना हटविण्यासाठी आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी हे विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेण्यासाठीच राष्ट्रवादीचा दुसरा गट सक्रिय झाल्याचेही दिसत आहे. परंतु, यात भाजपने पठाण यांच्या हातात हात घालून शिवसेना आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा लावून दिल्याचे दिसत आहे. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील हा वाद असाच पुढे चालू राहिला, तर त्याचा फटका या दोन्ही पक्षांना बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.