मुंब्य्रातील फेरीवाल्यांना मिळणार हक्काची जागा
By admin | Published: July 8, 2017 05:38 AM2017-07-08T05:38:07+5:302017-07-08T05:38:07+5:30
मुंब्य्रातील फेरीवाले आणि गाळेधारकांना केवळ जागा देऊन त्याठिकाणी पालिका त्यांचे पुनर्वसन करणार होती. परंतु, या संदर्भात गुरुवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंब्य्रातील फेरीवाले आणि गाळेधारकांना केवळ जागा देऊन त्याठिकाणी पालिका त्यांचे पुनर्वसन करणार होती. परंतु, या संदर्भात गुरुवारी त्यांच्या सघंटना आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आयुक्तांची भेट घेऊन यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार आता पालिका हे फेरीवाले आणि गाळेधारकांना इंटरनल सुविधा तर देणार आहेच, शिवाय प्राथमिक सोयीसुविधादेखील उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे येथील तब्बल ३९० फेरीवाले आणि १६० गाळेधारकांना मुंब्य्रातील अग्निशनम दलाच्या बाजूला असलेल्या भुखंडावर हक्काची जागा मिळणार आहे.
मागील काही महिन्यापूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. त्यात मुंब्य्रात रस्त्यावरीलदेखील अतिक्रमणे दूर केली होती. त्यानंतर बाधीत फेरीवाले आणि गाळेधारकांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी न्यायासाठी थेट न्यायालयातदेखील धाव घेतली होती. पालिकेनेदेखील या फेरीवाल्यांना पुनर्वसनाची हमी दिली होती. त्यानुसार त्यांचा सर्व्हे केल्यानंतर येथील बाधीत ३९० फेरीवाले आणि १६० बाधीत गाळेधारकांचे अग्निशमन दलाच्या बाजूला असलेल्या प्लॉटवर पुनर्वसन करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता. त्याला आयुक्तांनीदेखील मंजुरी दिली होती. या प्रस्तावानुसार केवळ येथील भूखंडच पालिका त्यांना वापरण्यासाठी देणार होती. त्यामुळे प्राथमिक आणि अंतर्गत सुविधा मिळाव्यात म्हणून गुरुवारी आमदार आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे फेरीवाले आणि गाळेधारकांनी जयस्वाल यांची भेट घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ४ बाय ४ आणि गाळेधारकांसाठी ७ बाय ७ ची जागा देणार आहे.
पाणी समस्या मार्गी लावा
मुंब्रा परिसरातील पाण्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी यावेळी आ. आव्हाड यांनी केली. त्यावर आयुक्तांनी, जलवाहिन्यांची दुरूस्ती, नवीन जलवाहिन्यांचे जाळे आणि जलकुंभांच्या बांधणीसाठी १२५ कोटी रुपये प्रस्तावित केले.
पावसाळ्याच्या सुरूवातीलाच मुंब्रा जलमय झाल्याने संतोषनगर, शिवाजीनगर कादर पैलेस, चांदनगर चारिनपडा रशीद कंपाउंड, देवरीपाडा येथील नाल्यांची दरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.