केळकर रोडवर पुन्हा अवतरला रिक्षा स्टँड!

By admin | Published: June 23, 2017 05:51 AM2017-06-23T05:51:54+5:302017-06-23T05:51:54+5:30

सतत होणारी वाहतूक कोंडी आणि ध्वनिप्रदूषणामुळे केळकर रोडवरील बेकायदा रिक्षा स्टँड बंद करण्याचा आदेश वाहतूक विभागाने देऊन काही

Rikshah stand again on Kelkar road! | केळकर रोडवर पुन्हा अवतरला रिक्षा स्टँड!

केळकर रोडवर पुन्हा अवतरला रिक्षा स्टँड!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सतत होणारी वाहतूक कोंडी आणि ध्वनिप्रदूषणामुळे केळकर रोडवरील बेकायदा रिक्षा स्टँड बंद करण्याचा आदेश वाहतूक विभागाने देऊन काही तास उलटतात न उलटतात तोच रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी एकत्र येत तो स्टँड त्याच जागी पुन्हा सुरू केला. या रस्त्यावर प्रवासी उतरवण्याची व्यवस्था आणि स्टँड दोन्ही असल्याने तेथे दिवसभर वाहतूक कोंडी होते आणि आवाज, हवेचे प्रदूषण होते. त्यामुळे व्यापारी, रहिवाशांचाही या स्टँडला विरोध होता, पण तोही डावलण्यात आला.
स्टेशन परिसरातील राथ रोड, उर्सेकरवाडी, साठ्ये मार्ग यावर वाहतूक न वळवता ती फक्त केळकर रोडवर आणण्यास रहिवाशांचा विरोध आहे. स्टेशन परिसरात प्रामुख्याने केळकर रोड, इंदिरा गांधी चौकात वाहतूक कोंडी होते. त्याला तेथील मुबलक रिक्षा स्टँड आणि प्रवासी उतरवणे कारणीभूत असल्याचे परिसरातील नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी या भागातील बेकायदा रिक्षा स्टँड हटवण्याची त्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी मंगळवारी दुकाने बंद ठेवली होती. त्यावर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा स्टँड बेकायदा असल्याचे स्पष्टही केले होते. त्यांच्या त्या कारवाईला जशास जसे उत्तर देत रिक्षा संघटनांनी पुन्हा तो त्याच जागी सुरू केला. ‘आमचा स्टँड येथे होताच; पण केवळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी वाहतूक विभागाच्या विनंतीमुळे आम्ही काहीकाळ पाटकर रोडवर गेलो होतो. आता केळकर रोडच्या अर्ध्या भागातील काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे. पालिकेने रस्ता सुरु केला आहे. आता आम्ही पुन्हा पूर्वीच्या स्टँडच्या ठिकाणी आलो आहोत. आम्हाला येथून हटवून हजारो प्रवाशांची गैरसोय करू नये,’ असे सांगत शहरातील रिक्षा चालक-मालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दत्ता माळेकर, काळू कोमास्कर, शेखर जोशी, संजय देसले, तात्या माने, संजय मांजरेकर, रामा काकडे यांच्यासह रिक्षाचालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. रिक्षा ही आमची रोजीरोटी आहे. ज्यांना या स्टँडचे, या विषयाचे राजकारण करायचे आहे, त्यांना खाण्या-पिण्याची भ्रांत नाही. राजकारण करायला शहरात भरपूर विषय आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
केळकर रोडचा रिक्षा स्टँड हा आरटीओच्या मंजुरीने सुरू झालेला आहे. अनेक वर्षांपासून तो तेथे आहे. त्यात कोणीही ढवळाढवळ करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. त्या स्टँडचा शुभारंभ झाल्यावर सर्व पदाधिकारी वाहतूक पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र नेवाळी दुर्घटनेमुळे गंभीरे बंदोबस्तात व्यस्त असल्याने ते भेटू शकले नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांनी स्टँड केळकर रोडवर पूर्ववत सुरू केल्याची कल्पना त्यांना फोनवरून दिली.

Web Title: Rikshah stand again on Kelkar road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.