ऐन निवडणुकीत उल्हासनगरात रिपाइंतील वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:07 AM2019-10-18T00:07:02+5:302019-10-18T00:08:48+5:30

रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी भगवान भालेराव यांच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले

Ripai disputes in Ulhasnagar in election | ऐन निवडणुकीत उल्हासनगरात रिपाइंतील वाद चव्हाट्यावर

ऐन निवडणुकीत उल्हासनगरात रिपाइंतील वाद चव्हाट्यावर

Next

- सदानंद नाईक
उल्हासनगर : रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी भगवान भालेराव यांच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असतानाही, राज्यमंत्र्यांच्या तोंडी आदेशान्वये भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांना जाहिर पाठिंबा दिल्याची माहिती शहर कार्यकारिणीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे भगवान भालेराव संतापले असून, पत्रकार परिषद घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे प्रसिद्धिपत्रक शहर कार्यकारिणीतील उपाध्यक्ष सज्जन शेकटे यांनी काढले आहे. याप्रकाराने ऐन निवडणुकीच्या काळात रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला आहे.


उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत होती. मात्र, रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष तथा गटनेते भगवान भालेराव यांनी निवडणूक रिंगणात उतरून रंगत आणली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी पत्रकार परिषद घेऊन भालेराव यांना तांत्रिक कारणाने पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नसल्याचे स्पष्ट करत, ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. भालेराव यांच्यामुळे शहरात तिरंगी लढत निर्माण झाली. बुधवारी रिपाइंच्या काही पदाधिकाºयांनी कुमार आयलानी यांच्या समक्ष टाउन हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन आयलानी यांना पाठिंबा घोषित केला. पक्षाचे नेते, राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या तोंडी आदेशान्वये भाजपला पाठिंबा घोषित केल्याची माहिती यावेळी राजू सोनावणे यांनी दिली.


रिपाइंतील काही पदाधिकाºयांनी आयलानी यांना पाठिंबा घोषित केल्याने, रिपाइंचे उमेदवार भगवान भालेराव यांनी आश्चर्य व्यक्त केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सर्व प्रकार माहीत असून माझा निवडणूक जाहीरनामा त्यांना दिल्याचेही भालेराव यांनी सांगितले. असे असताना पक्षाच्या काही स्थानिक पदाधिकाºयांनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, शहर कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सज्जन शेकटे यांनी प्रसिद्धिपत्रक काढून आयलानी यांना पाठिंबा देणाºयांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगितले. या प्रकाराने ऐन निवडणुकीत पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. शहर कार्यकारिणीतील मोजके पदाधिकारी सोडल्यास इतर पदाधिकारी माझ्यासोबत असल्याचा दावाही भगवान भालेराव यांनी केला.

मतदारसंघात तिरंगी लढत
मतदारसंघात सुरुवातीला भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत होती. मात्र, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात तिरंगी लढत होण्याचे चित्र शहरात आहे. शहरात रिपाइंची ताकद मोठी असून आंबेडकरी समाजाची लोकसंख्या ४० हजारांपेक्षा जास्त आहे. भगवान भालेराव यांच्यासह रिपाइंचे तीन नगरसेवक असून यामध्ये धर्मपत्नी अपेक्षा भालेराव यांचाही समावेश आहे.

Web Title: Ripai disputes in Ulhasnagar in election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.