रिपाइं सेक्युलर, राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी, काँग्रेसला विश्वासात न घेताच पार पडली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:51 AM2019-11-12T00:51:09+5:302019-11-12T00:51:13+5:30
अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक एप्रिलमध्ये होणार असून या निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं सेक्युलर यांची एकत्रित बैठक घेण्यात आली.
अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक एप्रिलमध्ये होणार असून या निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं सेक्युलर यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी आणि रिपाइं सेक्युलर यांची पुन्हा आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत एकत्रित काम करणाऱ्या काँग्रेसला विश्वासात न घेता ही बैठक उरकण्यात आली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चाही रंगली आहे.
अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि रिपाइं सेक्युलरचे प्रमुख श्याम गायकवाड यांची संयुक्त बैठक पार पडली आहे. या बैठकीत दोन्ही पक्ष आगामी पालिका निवडणुकीत पुन्हा एकत्र येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या पालिका निवडणुकीत हेच दोन्ही पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीतही हेच दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे सदस्य या बैठकीत उपस्थित नव्हते. दोन्ही पक्षांतर्फे आगामी नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीसाठी सदाशिव पाटील यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाल्यास राष्ट्रवादीकडून पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
>राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर करणे, हा त्यांचा हक्क आहे. याचा अर्थ असा नव्हे की, आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. पक्षातील वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आघाडीचा निर्णय घेण्यात येईल. शहराच्या विकासासाठी आणखी काही पक्ष एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर आमच्या सोबत जे येतील, त्यांना घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. - प्रदीप पाटील, अंबरनाथ ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस