रस्ता रूंदीकरणाला वाढता विरोध
By Admin | Published: May 22, 2017 02:01 AM2017-05-22T02:01:02+5:302017-05-22T02:01:02+5:30
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गोखले रोडसह अन्य पाच रस्त्यांच्या रुंदीकरणाचा विषय आयत्यावेळेस
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गोखले रोडसह अन्य पाच रस्त्यांच्या रुंदीकरणाचा विषय आयत्यावेळेस आणून मंजूर करणे, म्हणजे एकप्रकारे त्यांनी आपला मनमानी कारभार सुरू केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. या रस्ता रुंदीकरणाला आमचा कायमस्वरूपी विरोध राहणार आहे. वेळ पडल्यास आयुक्तांविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी नौपाडा परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.
पालिकेचे तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या क ाळात शहरात रस्ता रूंदीकरण झाले होते. त्यावेळी नौपाडा रोड परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण झाले. त्यामुळे आता या परिसरात जुन्या शहरातील ६५ टक्के बांधकाम उरले आहे. त्यात आता काय तोडणार? असा सवाल त्यांनी केला. त्यातच पुन्हा रूंदीकरणाचा विषय आयुक्तांनी आयत्या वेळेस आणून मनमानी कारभार सुरू केला आहे. त्याला व्यापाऱ्यांचा विरोध राहणार आहे. तसेच याबाबत लवकरच नौपाड्यातील व्यापारी एकत्र येऊन बैठक घेणार आहेत. मध्यंतरी रस्ता रूंदीकरणाचा विषय रद्द केला होता. त्यावेळी आमदार संजय केळकर यांनी रूंदीकरण होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांचीही या विषयाबाबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे नौपाडा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मितेश शहा यांनी सांगितले.
आयुक्तांनी अचानक हाती घेतलेल्या मुद्दयासंदर्भात काय निर्णय झाला आहे, त्याचा अभ्यास करावा लागणार असल्याचे एमसीएचआयचे माजी अध्यक्ष मुकेश चावला यांनी सांगितले. त्यानंतर रस्ता रूंदीकरणाबाबत भूमिका मांडता येईल, असे ते म्हणाले. पण, रुंदीकरणाच्या नावाखाली बांधकामे तुटणार असतील, तर त्याला विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले.