अंगणवाडीच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 03:27 AM2019-02-17T03:27:53+5:302019-02-17T03:28:20+5:30
जिल्हा परिषद शाळेची इमारतही जीर्णावस्थेत : भिंतीना तडे गेल्याने कोसळण्याची भीती; नवीन इमारत बांधण्याबाबत प्रस्ताव
संजय गायकवाड
कर्जत : तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या गोरेवाडी आदिवासीवाडीतील अंगणवाडीची दुरवस्था झाली. कोसळण्याच्या स्थितीत असल्याने सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ती भरवली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदेची इमारतही जीर्ण झाल्याने मुलांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
गोरेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या शेष फंडामधून २००८-२००९ या आर्थिक वर्षात महिला बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले आहे. सद्यस्थितीत इमारतीला मोठे तडे गेले आहेत, त्यामुळे ती कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. अंगणवाडी पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भरवली जात आहे; परंतु शाळेची इमारतही जीर्ण झाली आहे. गोरेवाडीसाठी नवीनच इमारत बांधून द्यावी, अशी मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे. अंगणवाडी कोसळल्यास शेजारच्या दोन घरांनाही धोका होऊ शकतो. यापूर्वी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे अंगणवाडी बांधकामाबाबत मागणी केली आहे; परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक चंद्राकात गोरे यांनी केला. महिला बालविकास प्रकल्पाच्या वतीने इमारत नादुरु स्त असल्याचे कळवल्यानंतर जिल्हा परिषदेने शाळेचा वर्ग वापरावयास दिला. नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला असल्याची माहिती सुपरवायझर शरयू तांबे यांनी दिली.
पोषण सेवावर देखरेख प्रकल्पांतर्गत गोरेवाडीमध्ये घेतलेल्या गाव बैठकीमघ्ये इमारतीच्या दुरवस्थेबाबत माहिती घेतली आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
- रवि भोई, कार्यकर्ते, देखरेख प्रकल्प, कर्जत