भिवंडीतील रस्त्यांवरून खडतर प्रवास सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:37 PM2019-11-06T23:37:35+5:302019-11-06T23:37:42+5:30
धुळीमुळे नागरिक त्रस्त : प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर मलमपट्टीवर भर
भिवंडी : शहरातील रस्त्यांवरील खड्डे, त्यातून उडणारी धूळ यामुळे नागरिकांना प्रवास करताना श्वास घेणेही मुश्कील होत आहे. रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झालेली असताना महापालिका मात्र थातूरमातूर मलमपट्टी करून दुरुस्ती केल्याचा दिखावा करत आहे. डांबरीकरण केलेल्या या रस्त्यांवरून अवजड वाहने जातातच. या कामांचे पितळ उघडे पडत आहे. मोठ्या वाहनांच्या मागे असलेल्या दुचाकीस्वारांची तर बिकट अवस्था होत आहे. उड्डाणपुलांवरही तीच स्थिती आहे. यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे.
भिवंडीतील अंजूरफाटा-वंजारपट्टीनाका रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी कोट्यवधींचा निधी एमएमआरडीए प्रशासनाने मंजूर केला आहे. ठेकेदारामार्फत या रस्त्याचे कामही सुरू आहे, मात्र या रस्त्याच्या कामाचे कोणतेही नियोजन नसल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. तर, याच मार्गावर असलेल्या धामणकरनाका येथील उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या उड्डाणपुलावरील खड्ड्यांतून उडणारी धूळ दुचाकीस्वारांसाठी मरणयातना ठरत आहे. या उड्डाणपुलाच्या देखभालीकडे मनपा प्रशासन लक्ष देत नसल्याने स्थानिकांसह प्रवाशांकडून मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, धामणकरनाका उड्डाणपुलाप्रमाणेच कल्याणनाका येथे असलेल्या उड्डाणपुलावरही मोठमोठे खड्डे पडल्याने या उड्डाणपुलाचीही दुरवस्था झाली आहे. शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांबरोबरच आता उड्डाणपुलांच्या दुरु स्तीकडेही मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
शहराच्या दुरवस्थेबाबत मनपाचे सत्ताधारी जबाबदार आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने शहराच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले असल्यानेच शहरातील रस्त्यांची व शहराची दुरवस्था झाली आहे. मनपा प्रशासनाने शहरविकासाबाबत योग्य आणि नियोजनबद्ध धोरण राबवावे, अन्यथा भाजपतर्फेतीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनपाचे विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांनी दिला आहे.
रस्त्याची कामे तातडीने हाती घेणार : आयुक्त
रस्त्यांच्या दुरवस्थेवर तातडीने उपाययोजना करण्यात येणार असून रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवण्यात येतील आणि शहरात १५ रस्त्यांची कामे सुरू होणार असून त्यासाठी योग्य नियोजन व उपाययोजनाही करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.