भिवंडीतील राजीवगांधी उड्डाणपुलाच्या गडरला ट्रकची धडक,बंद झालेली वहातूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 09:14 PM2018-09-24T21:14:50+5:302018-09-24T21:39:21+5:30
भिवंडी: दोन दिवसांपुर्वी सुरू झालेल्या राजीवगांधी उड्डाणपुलाच्या बागेफिरदोस येथील गडरला ट्रकने सोमवारी सायंकाळी धडक दिल्याने पुलावरील वहातूक पुन्हा दोन तास बंद पडली. पुलावरील वहातूक कोंडीने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले तर या घटनेची महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला दोन तासापर्यंत माहिती नव्हती. नागरिकांनी पुढाकार घेऊन तुटलेले गडर बाजूला काढून पुन्हा वहातूक सुरू केली.
ठाणारोड,वाडारोड व कल्याणरोड या मार्गांना जोडणारा शहरातील राजीवगांधी स्मृती उड्डाणपुल दुरूस्तीसाठी पंधरा दिवस बंद होता.दुरूस्तीनंतर जड वहानांना पुलावरून जाण्यास पालिका प्रशासनाने बंदी केली होती. जड वहाने पुलावरून जाऊ नयेत म्हणून पुलाच्या दोन्ही टोकाला म्हणजेच बागेफिरदोस व रामेश्वर मंदिर या ठिकाणी लोखंडी गर्डर बसविण्यात आले होते. तसेच या प्रवेश बंदीचे बॅनर या गर्डरवर बसविण्यात आले होते. तरी देखील जड वहानांनी प्रवेश करू नये म्हणून त्या ठिकाणी पालिकेचे सुरक्षारक्षकांची ड्युटी लावलेली होती. असे असताना सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान बागेफिरदोस येथे एका ट्रक चालकाने बँनरकडे दुर्लक्ष करीत पुलावरून ट्रक नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गर्डरला धक्का लागून लोखंडी गर्डर व त्यावरील बँनर तुटून ट्रकवर कोसळले. त्यामुळे पुन्हा राजीवगांधी उड्डाणपुलावर वहातूक कोंडी होऊन वहातूक बंद झाली. ही वहातूक बंद झाल्याने हलक्या वहानांतून जाणारे वाहनचालक,प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल झाले. ही घटना झाल्यानंतर तब्बल दोन तासांनी पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व पालिकेचे बांधकाम विभागातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान नागरिकांनी तुटलेले गडर बाजूला करून वहातूक पुर्ववत सुरू केली. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अशा बेशिस्त कारभाराबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असुन ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचे नागरिकांनी सांगीतले. मात्र पोलीसांनी ट्रक चालकाचे नाव सांगण्यास नकार दिला. मात्र यावेळी घटनास्थळी पालिकेने नेमलेले सुरक्षा रक्षक कोठे होते? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.