‘एनआरसी’त रोखला रस्ता

By Admin | Published: April 24, 2016 02:12 AM2016-04-24T02:12:53+5:302016-04-24T02:12:53+5:30

एनआरसी कंपनी क्वार्टर्समधील वीज आणि पाणीपुरवठा आठवड्यापासून बंद असल्यामुळे आक्रमक झालेल्या रहिवाशांनी शनिवारी तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला.

Road blocked in NRC | ‘एनआरसी’त रोखला रस्ता

‘एनआरसी’त रोखला रस्ता

googlenewsNext

म्हारळ : एनआरसी कंपनी क्वार्टर्समधील वीज आणि पाणीपुरवठा आठवड्यापासून बंद असल्यामुळे आक्रमक झालेल्या रहिवाशांनी शनिवारी तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला. तीन दिवसांपूर्वीच संतप्त महिलांनी कल्याणला महापालिका मुख्यालयात धडक दिली होती. मात्र, त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने शहाड-मोहने वाहतूक रोखून धरली.
एनआरसी कंपनी आणि कामगारांत गेली काही वर्षे देण्यांवरून संघर्ष सुरू आहे. न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. त्यामुळे कंपनी आणि कामगारांत सतत संघर्ष सुरू असतो. देणी न मिळाल्याने अनेक कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत रहिवासी कंपनीच्या क्वार्टर्समध्येच राहत आहेत. कंपनी कामगारांना कंपनीच्या क्वार्टर्समधून काढण्यासाठी वीज-पाणी बंद करण्याचा स्टंट करीत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. कंपनीची जवळपास सहा कोटींची वीज थकबाकी असल्यामुळे महावितरणने वसाहतीसह कंपनीचा वीजपुरवठा खंडित केला आणि त्यातून पाणी उपसले जात नाही. वीजही नाही, त्यात पाणी नसल्याने आठवडाभर रहिवाशांचे हाल सुरू आहेत. टॅँकरही वेळेवर मिळत नसल्यामुळे एनआरसी कॉलनीतील संतप्त महिलांनी अखेर मोहने येथे रास्ता रोको आंदोलन केले.

मूलभूत गरजा पुरवा
न्यायालयात प्रकरण असल्याने एकही लोकप्रतिनिधी आंदोलनकर्त्यांकडे फिरकला नाही. समस्यांकडे कोणीही पाहत नसल्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी प्रचंड उद्रेक पाहावयास मिळाला.
‘आम्ही फक्त आमच्या मूलभूत गरजा मागत आहोत, तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल, तर टाका,’ असेही काही महिलांनी पोलिसांना सांगितले.
पोलीस अधिकारीही त्यांना या मागण्यांसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत होते. परंतु, संतप्त महिला रस्त्यावरून उठण्यास तयार नव्हत्या. जवळपास १५०० ते १६०० कुटुंबे या कॉलनीत राहतात.

जगायचे कसे?
कॉलनीमध्ये लहान मुले आजारी पडत आहेत. कावीळ, टायफॉइडमुळे त्रस्त आहेत. गेले आठ दिवस झाले. लाइट नाही, पाणी नाही. आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न पडलाय.
- नीतू सिंग, गृहिणी,
एनआरसी कॉलनी

कंपनीची जबाबदारी
एनआरसी कंपनीने रहिवाशांचे हे प्रश्न सोडवायला हवेत. ती त्यांची जबाबदारी आहे. कंपनीची जवळपास सहा कोटींची थकबाकी आहे.
- भारत पवार, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कल्याण

Web Title: Road blocked in NRC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.