रिक्षा बंदमुळे उल्हासनगरात हाल, रस्त्यांच्या दुरवस्थेचा चालकांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:12 AM2017-11-07T00:12:55+5:302017-11-07T00:12:59+5:30
रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटनांनी रिक्षा बंदची हाक दिल्याने सोमवारी चाकरमान्यांसह, नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले
उल्हासनगर : रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ विविध रिक्षा संघटनांनी रिक्षा बंदची हाक दिल्याने सोमवारी चाकरमान्यांसह, नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. रस्त्यांच्या दुरवस्थेला पालिकाच जबाबदार असल्याचा ठपका रिक्षा चालकांनी ठेवला. पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आश्वासनानंतर सायंकाळी हा बंद मागे घेण्यात आला.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळयापूर्वी आणि नंतर रस्त्याची दुरस्ती केलेली नाही. त्यामुळे सर्व रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याबाबत वारंवार निवेदने देऊनही फरक न पडल्याचा आरोप करत रिक्षा संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासूनच रिक्षा बंद ठेवल्या. शहीद मारोती जाधव चालक-मालक रिक्षा संघटना, रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनसह इतर रिक्षा संघटना यात सहभागी झाल्या होत्या. दिवाळीच्या सुट्या संपून शाळेत निघालेले विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, बाहेरगावाहून आलेले प्रवासी यांना या बंदचा फटका बसला. बंदमुळे उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि शहाड रेल्वे स्टेशनवर रिक्षा बंदमुळे शुकशुकाट होता.
रिक्षा संघटनेचे राजा पाटील, रवींद्रसिंग भुल्लार यांच्यासह इतर संघटनांचे नेते, पदाधिकाºयांनी पालिका आयुक्तांशी चर्चा केली आणि मागण्या मांडल्या. पालिकेने रस्ता दुरस्तीसह खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. राज्य सरकारच्या निधीतून विविध रस्त्यांचे काम सुरू आहे, असे सांगत आयुक्तांनी रस्ते सुस्थितीत ठेवण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर हा बंद मागे घेण्यात आला.