भिवंडीतील रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:38 PM2019-06-04T22:38:45+5:302019-06-04T22:39:11+5:30
नागरिकांचा आरोप : आयआयटी तज्ज्ञांद्वारे तपासणीनंतरच बिल काढण्याची मागणी
भिवंडी : वर्षभरापासून शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पावसाळा तोंडावर आल्यानंतर धडपड सुरू झाली आहे. नगरसेवक आपापल्या वॉर्डांत रस्तेदुरुस्तीचे काम हाती घेऊ न त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करताना खासगी ठेकदारांकडून निकृष्ट दर्जांच्या रस्तेकामांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. हे रस्ते पावसाळ्यात वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून पालिका आयुक्तांनी विविध भागांत झालेल्या डांबरीकरणाची पाहणी करून आयआयटीच्या तज्ज्ञांकडून तपासणी करून ठेकेदारांना बिल अदा करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
शहरातील प्रभाग समिती क्र. १ ते ५ मधील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची वर्षभरापासून दुरवस्था झालेली आहे. केवळ विविध मिरवणुकांच्या मार्गांवरील रस्ते आणि मंत्र्यांच्या स्वागतासाठी नव्याने रस्ते बनवण्यात आले आहेत. महापालिकेच्या महासभेने निवडणुकीपूर्वी १५ कोटी रस्तेदुरुस्तीसाठी मंजूर केले होते.
पालिकेच्या बांधकाम विभागाने खाजगी ठेकेदारामार्फत शहरातील जुना ठाणे रोड, बंदर मोहल्ला, दर्गा रोड, शांतीनगर, गैबीनगर, कल्याण रोड, निजामपुरा, बंगालपुरा, समदनगर, कुंभारआळी, ब्राह्मणआळी, सौदागर मोहल्ला, मानसरोवर रोड आदी ठिकाणच्या खराब झालेल्या रस्त्यांवर पॅचवर्क व डांबरीकरणाचे काम ठेकेदारामार्फत सुरू करण्यात आले आहे.
हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने रात्री दुरुस्त केलेला रस्ता दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी उखडलेला दिसत आहे. रस्तेदुरुस्तीवेळी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व प्रभाग अधिकारी उपस्थित नसल्याने काही ठेकेदारांनी रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची व काळे ऑइल डांबर वापरून केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
पावसाळ्यात रस्ते वाहून जाण्याची भीती
कामे निकृष्ट दर्जाची असल्याने रस्ते पहिल्याच पावसात वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामांची बिले पाऊस सुरू होण्याआधीच मिळवण्यासाठी ठेकेदार बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून मिळवण्यासाठी घाई करत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी शहरातील रस्ता डांबरीकरणाच्या कामाची सरकारी संस्था आयआयटीमार्फत तपासणी करूनच बिल द्यावे, अशी मागणी आमदार शांताराम मोरे यांनी केली आहे.