पालिकेने दिले महिलांना स्वयंरोजगारासाठी संगणक शिक्षणाचे मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 10:22 PM2018-03-30T22:22:21+5:302018-03-30T22:22:21+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने यंदापासून महिला-मुलींना इंग्रजी शिकण्यासह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व संगणकाशी संबंधित विविध प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने यंदापासून महिला-मुलींना इंग्रजी शिकण्यासह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व संगणकाशी संबंधित विविध प्रशिक्षण दिले जाणार आहे. समितीच्या सभापती शानू गोहिल म्हणाल्या की, समितीच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण महिलांना मोफत दिले जाते. यंदापासून महिलांना घरबसल्या व्यवसाय सुरू करता यावा वा स्वयंरोजगाराची संधी मिळावी याकरिता संगणकासह इंग्रजी शिकण्याचे प्रशिक्षण आम्ही सुरू केले आहे. महिलांकरिता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसारखा उपक्रम सुरू करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न आहे.
याशिवाय महिला व मुलींसाठी बेसिक, डीटीपी , टॅली, मराठी - इंग्रजी संगणक टायपिंगसह कापडी पिशव्या बनवणे, कुकिंग व बेकिंग असे नवे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. आधीपासून वेब डिझायनिंग, ड्रायव्हिंग , कराटे - योगा, शिवणकाम आदींचे प्रशिक्षण देखील दिले जात आहे. महापौर डिंपल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी महिलांना एकाच ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी महिला भवन सुरू करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. पण सध्या विविध प्रशिक्षण वर्गासाठी महिलांना सोयीस्कर अशा ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महिला व मुलींना या प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज भरून महापालिका मुख्यालयासह महिला नगरसेविकांमार्फत देता येतील, असं गोहिल म्हणाल्या.