काँक्रिटच्या रस्त्याला पडल्या भेगा, केडीएमसीचे कंत्राटदाराला अभय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 03:44 AM2017-10-26T03:44:49+5:302017-10-26T03:46:26+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेने २०११ मध्ये हाती घेतलेली रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने २०११ मध्ये हाती घेतलेली रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित २० टक्के कामे बाकी आहेत. त्यातच, कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्कसमोरील काँक्रिटच्या रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच तेथे मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. सध्या या भेगा बुजवण्यात येत आहेत. मात्र, भेगांमुळे काम निकृष्ट झाल्याचे स्पष्ट झाले असतानाही महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे तो मोकाटच आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न २०१० मधील महापालिका निवडणुकीत गाजला होता. तेव्हा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहरातील प्रमुख रस्ते काँक्रिटीकरण केले जातील, असे जाहीर केले होते. राज्य सरकारच्या नगरोत्थान अभियानांतर्गत महापालिकेस पहिल्या टप्प्यात १०३ कोटी, तर दुसºया टप्प्यात ३०० कोटी रुपयांचा निधी मिळाला. या निधीतून पहिल्या टप्प्यात कल्याणमधील आधारवाडी-गांधारे, दुर्गाडी ते बिर्ला कॉलेज आणि कल्याण पूर्वेतील श्रीराम टॉकीज ते चक्कीनाका रस्ता, तर दुसºया टप्प्यात उर्वरित कल्याण-डोंबिवलीतील ४३ रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले. मात्र, पहिल्या टप्प्यातील कल्याण पूर्वेतील रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. तसेच दुसºया टप्प्यातील काही रस्ते केवळ ८० टक्केच पूर्ण झालेले आहेत. डोंबिवलीच्या एका रस्त्याचे काँक्रिटीकरण केले असताना त्यावर पुन्हा डांबरीकरणाचा थर देण्यात आला.
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. रस्त्याचे काम योग्य तापमानात न केल्याने रस्त्याला भेगा गेलेल्या आहेत. हा मुद्दा दोन वर्षांपूर्वी चांगलाच गाजला होता. त्यानंतर, या अहवालानुसार दोषींवर कारवाई होणे अपेक्षित होते. त्यावेळी निकृष्ट रस्त्याचे काम पुन्हा करून घेतले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने महासभेत दिले होते. मात्र, ते हवेत विरले आहे.
गोल्डन पार्कसमोरील रस्त्यावर पडलेल्या भेगा प्रशासनाकडून बुजवण्याचे काम केले जात आहे. मात्र, निकृष्ट काम करणाºया कंत्राटदारावर काय कारवाई करणार, याविषयी प्रशासनाने मौन बाळगले आहे. त्यामुळे निकृष्ट कामे करणारे कंत्राटदार मोकाट सुटले आहेत. निकृष्ट काम करून कंत्राटदारांनी कोट्यवधी रुपयांची बिले त्या बदल्यात लाटली आहेत.
>झाडाझडती व्हावी
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामात दर्जा राखण्यासाठी आयुक्त पी. वेलरासू यांनी अभियंते तरुण जुनेजा व घनश्याम नवांगुळ यांची नियुक्ती केली आहे. त्याच धर्तीवर काँक्रिटच्या निकृष्ट कामांचीही झाडाझडती व्हावी. त्यातून सत्य समोर येईल.
रस्ते विकास अहवालात उघड झालेल्या निकृष्ट बाबी तपासल्या गेल्या पाहिजेत. त्यानुसार, संबंधित रस्त्याचे काम पुन्हा नव्याने केलेले आहे का, याचा आढावा प्रशासनाने घेणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेतील अधिकारीच प्रशासनाची व नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक करत आहेत. ते केवळ कंत्राटदारांची पाठराखण करत आहेत, हेच यातून उघड झाले आहे.