ठाणे, पालघर, रायगडमध्ये रस्त्यांची दुरवस्था, खड्डे असूनही टोलवसुली दोन्ही जिल्ह्यांत सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 01:05 AM2019-09-29T01:05:40+5:302019-09-29T01:06:15+5:30
गणपतीबाप्पांचे खड्ड्यांतून आगमन झाले व त्यांना निरोप देतानाही रस्त्यांना खड्डे होते. आता नवरात्रोत्सवात देवीचे आगमनही खड्ड्यांतून होणार आहे.
ठाणे : गणपतीबाप्पांचे खड्ड्यांतून आगमन झाले व त्यांना निरोप देतानाही रस्त्यांना खड्डे होते. आता नवरात्रोत्सवात देवीचे आगमनही खड्ड्यांतून होणार आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणे आणि पालघर व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तिन्ही जिल्ह्यांमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे १० दिवसांच्या आत बुजवण्याचे आदेश दिले होते. अन्यथा टोल वसुली बंद केली जाईल असेही स्पष्ट केले होते. आज ही दहा दिवसांची मुदत उलटून गेली असतांनाही या परिसरातील खड्डे तसेच आहेत आणि टोल वसुलीही सुरु असल्याने पालकमंत्र्यांचे आदेश हवेत विरले का, असा सवाल खड्ड्यांमधून प्रवास करणारे प्रवासी उपस्थित करीत आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात दुप्पट पाऊस झाला आहे. त्यामुळे ठाण्यासह, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर टीका झाली. सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच रायगड व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत नवरात्रोत्सवापूर्वी हे सर्व खड्डे बुजवले जावेत, असे आदेश संबधींत यंत्रणांना देण्यात आले होते.
रविवारपासून नवरात्रोत्सव सुरु होणार असून देवींचे आगमन हे खड्ड्यांतून झाले आहे. ठाणे शहरातील सर्वच महत्त्वांच्या रस्त्यांवरील खड्डे आजही कायम आहेत. नितीन कंपनी, तीनहात नाका, मल्हार सिनेमा, पालिकेचे तीनही उड्डाणपूल, कापुरबावडी, घोडबंदर भागातील सेवा रस्ते आदींसह शहरातील इतर रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत. कल्याण - डोंबिवली किंवा रायगड अथवा पालघर आदी भागांतील रस्त्यांचीही चाळण झाली आहे. काही ठिकाणी तात्पुरती ठिगळ लावण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने हे प्रयत्न धुवून गेले. १० दिवसांत खड्डे बुजवले नाही, तर टोल वसुली बंद करण्यात येईल असे जे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र हे दोघे पालकमंत्री आपल्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे खड्ड्यांमुळे त्रस्त मतदारांना सुखावण्याकरिता हे आश्वासन दिले होते का, असा सवाल केला जात आहे.
निर्णय धाब्यावर?
यापूर्वी जेव्हा जेव्हा सणासुदीला मुंबई बाहेर जाताना किंवा मुंबईकडे येताना टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागून प्रवासी कोंडीत अडकतील, तेव्हा पिवळ्या पट्ट्यापलिकडे वाहनांची रांग गेल्यास टोल न आकारता वाहने सोडण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी कधीच फारशी झाली नाही.
टोलवसूल करणाºया कंपन्यांच्या दबावापोटी असे निर्णय अंमलात येत नाहीत. खड्ड्यांमुळे टोलवसूल न करण्याचा निर्णयही अशाच दबावापोटी धाब्यावर बसवला असल्याचे बोलले जात आहे.