Eknath Shinde | राज्याच्या विकासासाठी रस्ते जोडणी महत्वाची - एकनाथ शिंदे
By अजित मांडके | Published: February 6, 2023 03:53 PM2023-02-06T15:53:08+5:302023-02-06T15:53:40+5:30
नवनवीन प्रकल्प हाती घेतले जात असून आम्ही तसेच विकासाला प्राधान्य दिले आहे!
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्याचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी कनेटीव्हीटी महत्वाची आहे. कनेटीव्हीटी असेल तर राज्याचा विकास तर होतोच, शिवाय रोजगारही उपलब्ध होत असल्याचे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानुसार समृध्दी महामार्ग, बोरीवली टनेल आदींसह फ्री वेचा देखील विस्तार फाऊंटनपर्यंत करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ठाण्यातील रेमंड ग्राऊंड येथे एमसीएचआय क्रेडीया ठाणे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपट्री मेळ्याला शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितीतांना मार्गदर्शन करतांना त्यांनी हे भाष्य केले. यापूर्वीच्या सरकारच्या काळात विकास थांबला होता. परंतु जेव्हा पासून सर्वसामान्यांचे सरकार राज्यात आले आहे, तेव्हा पासून विकासाला वेग आला आहे. नवनवीन प्रकल्प हाती घेतले जात आहे, नवनवीन करार केले जात आहेत. तसेच विकासाला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. तुम्ही घर बांधता, घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, कोणाचे वन, टू थ्री बिएचके अशी प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. परंतु ज्याच्या खिशात जेवढे पैसे त्यानुसार घर खरेदीला पसंतीक्रम दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कोवीडमध्ये सर्वाना त्रास झाला. मात्र त्या काळात सरकार आणि लोकल बॉडीला देखील विकासकांनी सहकार्य केले. ज्या शहरात आपण काम करतो, त्याला आपण काही तरी देणे लागतो या भावनेने काम करणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
युनीफाईड डीसीआर या नव्या कायद्याचा फायदा झाला आहे, परंतु त्यावेळी बांधकाम व्यवसायिकांचे हित जपतो म्हणून माझ्यावर टिका झाली. परंतु या क्षेत्रातील नेमक्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याकरीता तशी नियमावली करणे गरजेचे होते. नियमावली केवळ कागदावर राहू नये आणि त्याच्या अंमलबजावणीचा फायदा नागरिक तसेच बांधकाम क्षेत्राला व्हावा यासाठी बांधकाम संघटनेशी चर्चा केली. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून बांधकाम क्षेत्राकडे पाहिले जाते आणि त्यामुळेच या क्षेत्राला सवलती देण्याचे काम केले, असेही ते म्हणाले.
शहरांच्या विकासाबरोबरच रस्ते जोडणीची कामे करणे गरजेचे असून यामुळेच नागपुर-मुंबई, वसई-विरार कॅरीडोअर, ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग तसेच इतर प्रकल्पांची कामे राज्य सरकार करीत आहे. मुंबई फ्री-वे हा मार्ग थेट घोडबंदर येथील फाऊंटन हाॅटेलजवळील चौकातील पुलाला जोडण्यात येणार आहे. शिवडी-न्हावाशिवा ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते रायगड असा थेट प्रवास करणे शक्य होणार असून हा रस्ता मुंबई- पुणे आणि मुंबई-गोवा या मार्गांनाही जोडण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, तेव्हा मुंबईत मेट्रोची कामे वेगाने सुरु होती. पण, अडीच वर्षे कामे बंद होती. आता आमचे सरकार येताच आम्ही सर्व बंद कामे सुरु केली, असेही त्यांनी सांगितले. मागील सरकारने उद्योगांना सवलती दिल्या नाहीत आणि त्यामुळे ते राज्याबाहेर गेले. या कंपन्यांनाही माहित नव्हते की सरकार बदलणार आहे. आता आमचे सरकार आल्यानंतर उद्योगांना सवलती देण्यात येत असून यामुळेच दावोसमध्ये अनेक कंपन्यांसोबत करार झाले आहेत, असेही ते म्हणाले.