ठामपाकडून मुंब्रा-दिव्यात बिल्डरांसाठी रस्तेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:41 AM2021-03-31T04:41:13+5:302021-03-31T04:41:13+5:30
ठाणे : बड्या बिल्डर्ससाठी निर्मनुष्य भागात कोट्यवधी रुपये खर्चून ठामपाकडून रस्ते बांधले जात आहेत, असा आराेप मंगळवारी स्थायी समितीच्या ...
ठाणे : बड्या बिल्डर्ससाठी निर्मनुष्य भागात कोट्यवधी रुपये खर्चून ठामपाकडून रस्ते बांधले जात आहेत, असा आराेप मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी केला.
मुंब्रा ते दिवा मुख्य रस्ता, कौसा, खर्डी आदी भागात रस्ता रुंदीकरणासाठी अनेक घरे, दुकाने जमीनदोस्त केली होती. मागील आयुक्तांच्या कार्यकाळात ही कारवाई झाली होती. मात्र, विद्यमान आयुक्तांच्या कार्यकाळातही हे काम पूर्ण झालेले नाही. यास जबाबदार कोण? एकीकडे बड्या बिल्डर्सचे नवीन प्रकल्प येण्यापूर्वीच तिथे रस्ते बांधण्यासाठी पालिकेचे अधिकारी पायघड्या टाकत आहेत. मात्र, गोरगरिबांना बेघर केल्यानंतरही रस्ते बांधले जात नाहीत. गरिबांकडून फायदा नसल्याने हे रस्ते केले जात नाहीत. अशा स्थितीत एका रात्रीत दुकानदारांना भिकेकंगाल करण्यास जबाबदार कोण? याची माहिती त्यांनी मागितली. रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या जलवाहिन्या स्थलांतरित करण्यात येणार होत्या. त्यासाठी आर्थिक तरतूदही केलेली आहे. मात्र, ठेकेदारांनी हे कामही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे या कामाचा ठेका ज्या ठेकेदारांना दिलेला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. अनेक ठिकाणी नालेसफाई रखडलेली आहे. पावसाळ्याला अवघे दोन महिने राहिले आहेत. तरीही नालेसफाईच्या कामाला वेग आलेला नाही. ती न झाल्याने शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे नालेसफाईचे काम वेगवान करावे, अशीही मागणी त्यांनी केली.
शुक्रवारी स्थायी समितीचा दौरा
शानू पठाण यांनी रस्त्यांच्या कामासंदर्भात आक्रमकता धारण केल्यानंतर स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी शुक्रवारी या भागाचा दौरा प्रस्तावित केला आहे. या दौऱ्यात ते अर्धवट कामांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.