डोंबिवलीतील रस्ता झाला गुलाबी; प्रदूषण नसल्याचा ‘कामा’ संघटनेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 01:42 AM2020-02-05T01:42:44+5:302020-02-05T01:42:59+5:30
डोळे चुरचुरण्याच्या तक्रारी
डोंबिवली : रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे डोंबिवली शहर नेहमीच चर्चेत असते. मात्र, मंगळवारी एमआयडीसीतील फेज २ मधील एक रस्त्यावर रासायनिक पदार्थ सांडल्याने तो गुलाबी, लाल रंगाचा झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी उग्र दर्प येत असल्याच्या तसेच डोळे चुरचुरणे यासारखा त्रास झाल्याच्या तक्रारी केल्या. दरम्यान, हे प्रदूषण नसल्याचा दावा कारखानदारांच्या ‘कामा’ संघटनेने केला आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरात अनेक रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून वायुप्रदूषण तसेच सांडपाणी प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी खुलेआम सोडून देणे यासारखे प्रकार सुरू असतात. यासंदर्भात तेथील नागरिकांनी वारंवार एमआयडीसी तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडेही तक्रारी केल्या आहेत. त्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
प्रदूषणामुळे काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा, भगव्या रंगाचा तेल मिश्रित पाऊस पडला होता. त्यात आता एमआयडीसीतील एक रस्ता रसायन पडल्याने गुलाबी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात लाल पाणीही दिसून आल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा झाली. दरम्यान, गुलाबी रस्त्यांसंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
गुलाल बनवण्यासाठी गुलाबी रंगाचे उत्पादन करणारी कंपनी २०१० मध्येच बंद झाली. मंगळवारी रस्त्यावर गुलाबी रंग दिला. मात्र, तेथे गटाराच्या बांधकामसाठी केलेल्या खोदकामातील माती लाल रंगाची निघाली होती. या मातीचा परिसरातील पाण्याशी संपर्क झाला. त्यामुळे रस्त्यावर गुलाबी रंग दिसू लागला. त्यामध्ये रासायनिक प्रदूषणाची घटना नाही.
- देवेन सोनी, अध्यक्ष कामा संघटना