औद्योगिक परिसरातील वाट खडतर, काँक्रिटच्या रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:48 PM2019-11-04T23:48:21+5:302019-11-04T23:48:42+5:30
काँक्रिटच्या रस्त्यांची दुर्दशा : मालाच्या नुकसानीमुळे डोंबिवलीतील कारखानदार त्रस्त
डोंबिवली : शहरातील औद्योगिक निवासी परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली असताना कारखान्यांच्या आवारातील रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. बहुतांश रस्ते काँक्रिटचे आहेत. परंतु, पेव्हरब्लॉक खचल्याने तसेच काँक्रिटच न राहिल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. कारखान्यांमधील तयार झालेल्या मालाची या रस्त्याने वाहतूक करताना त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कारखानदार त्रस्त झाले आहेत.
केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर १ जून २०१५ ला २७ गावांचा औद्योगिक परिसरासह महापालिकेत समावेश झाला. परंतु, येथील नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? यावरून केडीएमसी व एमआयडीसी प्रशासनात मतभेद आहेत. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या प्रवृत्तीमुळे औद्योगिक भागातील नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे.
निवासी विभागातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. कचराही वेळेत उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचून स्थानिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. पावसाळ्यात तर ठिकठिकाणी पाण्याची डबकी निर्माण होत आहेत. परिणामी, घराघरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचे नुकसान झाल्याचेही यंदाच्या पावसाळ्यात पाहायला मिळाले. त्याचबरोबर औद्योगिक परिसरातील कारखान्यांच्या भोवतालचे रस्तेही सुस्थितीत नाहीत. या भागात सुमारे ४५० कारखाने आहेत. कारखान्यांच्या परिसरातील बहुतांश रस्ते हे काँक्रिटचे आहेत. परंतु, काही ठिकाणी पेव्हरब्लॉकचा वापरही करण्यात आला आहे. मात्र, हे पेव्हरब्लॉक कारखान्यांमध्ये अवजड वाहनांमुळे पूर्णपणे खचलेले आणि तुटलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्यांमध्ये मोठी डबकी निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यातून वाहन नेताना वाहनचालकांची कसरत होत असून दुचाकी अडकून पडल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत.
दुसरीकडे काँक्रिटच्या रस्त्याला लागून असलेले डांबरी रस्तेही खचले आहेत. दोघांच्या पातळीत उंचसखल भाग झाल्याने याठिकाणीही वाहने जोरदार आदळत आहेत.
रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. रस्त्यावरील डांबरही निघून गेल्याने धुळीचा त्रासही चालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. प्रामुख्याने हे चित्र औद्योगिक कारखान्यांलगतच्या सर्व्हिस रोडवर पाहायला मिळते.
मुख्यमंत्र्यांनाही
दिले पत्र
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत एमआयडीसी, केडीएमसी यांच्याशी पत्रव्यवहार केले आहेत. याप्रकरणी उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्रे पाठविली आहेत. परंतु, अद्यापही रस्त्यांची सुधारणा झालेली नाही. या खड्डेमय रस्त्यांमुळे मालाचेही मोठे नुकसान होत आहे. या रस्त्यांवरून शाळेच्या बसही जात असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षाही धोक्यात आली आहे, असे कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले.
रस्त्यावर पसरलेल्या सांडपाण्यातून करावी लागली येजा
औद्योगिक निवासी भागातील सर्व्हिस रोडवर सांडपाणी वाहून नेणारे गटार तुंबल्याने तेथील रस्त्याच्या बहुतांश भागात सांडपाणी साचले होते. अन्य पर्याय नसल्याने गेले दोन दिवस या घाणेरड्या पाण्यातून वाहनचालक आणि पादचारी ये-जा करीत होते. दरम्यान, सोमवारी दुपारी गटार साफसफाईचे काम संबंधित यंत्रणेकडून सुरू करण्यात आले होते. येथील लगतच्या रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण केली असताना सांडपाण्यातून वाट काढणे स्थानिकांसाठी जिकिरीचे होऊन बसले होते.