बदलापूर गावाकडे जाणारा रस्ता बनला अपघातप्रवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:26 AM2021-07-11T04:26:59+5:302021-07-11T04:26:59+5:30
बदलापूर : बदलापूरच्या उल्हास नदीकडून बदलापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर माेठ्या प्रमाणावर अपघात वाढले आहेत. यापूर्वी हा रस्ता अरुंद ...
बदलापूर : बदलापूरच्या उल्हास नदीकडून बदलापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर माेठ्या प्रमाणावर अपघात वाढले आहेत. यापूर्वी हा रस्ता अरुंद असल्याने येथून वाहने कमी वेगाने जात असत. काही महिन्यांपूर्वी हा रस्ता रुंद करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचा वेगावर ताबा राहिलेला नाही. या रस्त्यावर धोकादायक वळण असल्याने अपघातांत आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वळणाच्या ठिकाणी गतिरोधक लावण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
बदलापूर, म्हसा, मूळगाव तसेच मुरबाडला जाण्यासाठी अनेक नागरिकांना हा मार्ग सोयीचा ठरतो. या रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्यानंतर या रस्त्यावर वाहनांची वर्दळ पहायला मिळत आहे. मात्र, याच रस्त्यावरील धोकादायक वळणावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत असल्याने आता स्थानिकांकडून या वळणावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर आणि रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्रीही अपघात घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच या वळणावर एक चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उलटले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून येथे गतिरोधक टाकावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
------