पोलिसांची बारबालांसह रोड परेड; काशिमीरा पोलिसांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 01:27 AM2019-12-09T01:27:45+5:302019-12-09T01:28:01+5:30
ऑर्केस्ट्रा बारच्या आड खास पोशाखात अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या बारबालांचे व्हिडीओ अनेकवेळा पाहायला मिळतात
मीरा रोड : ऑर्केस्ट्रा बारच्या आड खास पोशाखात अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या बारबालांचे व्हिडीओ अनेकवेळा पाहायला मिळतात. पण, नऊ ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाºया ५५ ते ६० बारबालांची भररस्त्यावरची परेड पाहून सर्वसामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या. काशिमीरा पोलिसांनी बांगलादेशी असल्याच्या संशयावरून बारबालांची पडताळणी करण्यासाठी नजीकच्या पोलीस चौकीवर वाहतूककोंडीमुळे चालतच न्यावे लागले. या परेडवर टीका होत असून, याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत सर्वात जास्त ऑर्केस्ट्रा बार आणि लॉज आहेत. ऑर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास बेकायदा प्रकार चालत असल्याचे तसेच वेश्या व्यवसायही चालत असल्याचे आतापर्यंत दाखल विविध झालेल्या गुन्ह्यांवरून स्पष्टच आहे. पण, याच बार व लॉजमुळे काशिमीरा पोलीस ठाणे क्रीम पोस्टिंग म्हणून पोलीस यंत्रणेत ओळखले जाते. बहुतांश बार व लॉजमधून चालणाºया गैरप्रकारांना खालपासून वरपर्यंत पोलीस यंत्रणेचा वरदहस्त असल्याचा आरोप नेहमीच होतो. तसेच या बेकायदा बांधकामांना महापालिका आणि लोकप्रतिनिधींचे अभयसुद्धा टीकेचा विषय ठरलेला आहे.
काशिमीरा पोलीस निरीक्षक राम भालसिंग आणि त्यांच्या पोलीस पथकाने शनिवारी रात्री ८ च्या सुमारास बम्पर, मानसी, मिली, मिलेनियम २०००, नाइट लव्हर, के नाइट, जे नाइट, मेला, ब्ल्यू नाइट या आॅर्केस्ट्रा बारवर धाडी टाकल्या. बारमध्ये काम करणाºया बारबालांमध्ये काही बांगलादेशी तरुणी असल्याचा पोलिसांना संशय होता. बारबालांचा नोकरनामा, नोंदणी आदींचीदेखील पडताळणी यानिमित्ताने केली गेली. या बारमधून ताब्यात घेतलेल्या ५५ ते ५० बारबालांना पडताळणीसाठी दहिसर चेकनाका येथील पोलीस चौकीत न्यायचे होते. परंतु, या भागात मेट्रोचे सुरू असलेले काम आणि आधीपासूनच असलेली वाहतूककोंडी पाहता त्यांना चालतच पोलीस चौकीत नेण्यात आले. याशिवाय, इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या बारबालांना नेण्यासाठी पोलिसांकडे पुरेशी वाहनेसुद्धा नव्हती.
बारबालांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे २५ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कडे केले आणि त्यांना पोलीस चौकीपर्यंत पायीच नेले. बारबालांसोबत पोलिसांचीदेखील पायपीट झाली. चौकीत गेल्यावर पोलिसांनी बारबालांचे आधारकार्ड, नोकरनामा आदींची पडताळणी करून खात्री केली. पडताळणी केल्यावर बारबालांना सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे, या नऊ बारवर पोलिसांच्या धाडी पडल्याचे कळताच अन्य ऑर्केस्ट्रा बारचालक सावध होऊन त्यांनी बारबालांना रवाना केल्याचे सूत्रांनी सांगितले.
ऑर्केस्ट्रा बारमध्ये गायिका वा ऑर्केस्ट्रा कलाकार म्हणून चार जणींना रात्री दीडपर्यंत बारमध्ये ठेवण्याची परवानगी आहे. महिला वेटर म्हणून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत परवानगी आहे. मात्र, बारबाला आकर्षक आणि कमी कपड्यांमध्ये उशिरापर्यंत नाच करताना आढळून आल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशातच बारबाला आणि पोलिसांची ही परेड लोकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. काहींनी बारबालांना असे चालत न्यायला नको होते, असे म्हणत पोलिसांवर टीका चालवली आहे.
काही बारबाला बांगलादेशी असल्याची माहिती मिळाल्यावरून तातडीने तपासणी करण्यात आली होती. महिला कर्मचाºयांची पडताळणी केल्यावर त्यांना सोडून देण्यात आले. वाहतूककोंडी विचारात घेऊन त्या महिलांना उशीर होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तात जवळच असलेल्या चौकीवर नेण्यात आले. महिलांच्या कामाची वेळ संपल्यावर खाजगी वाहनाने सुरक्षितरीत्या त्यांना घरी सोडण्याचे बारचालकांना बजावले आहे. बारमध्येदेखील त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले आहे.
- राम भालसिंग, पोलीस निरीक्षक, काशिमीरा
मीरा-भाईंदरमधील ऑर्केस्ट्रा बारच्या आड बारबालांना गैरप्रकारांसाठी प्रवृत्त करण्याच्या तक्रारी नेहमीच होतात. शहराची बार व लॉज विकृतीची ओळख सामान्य महिला आणि नागरिकांना सहन होणार नाही. रस्त्यावरून जाणाºया या बारबालांना पाहून बारमध्ये काय होत असेल, याची कल्पना कोणालाही सहज येईल. पोलिसांनी बार-लॉजमधून चालणारे गैरप्रकार सातत्याने कठोर कारवाई करून मोडले पाहिजेत. पालिकेनेदेखील बेकायदा बांधकामांवर कारवाई केली पाहिजे.
- भावना भोईर, नगरसेविका, शिवसेना