उल्हासनगरात डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी रस्त्याची दुरुस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:41 PM2022-04-12T16:41:37+5:302022-04-12T16:43:18+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महापालिका बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम गेल्या दोन दिवसांपूर्वी सुरू केले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महापालिका बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम गेल्या दोन दिवसांपूर्वी सुरू केले. मिरवणुका निघणारे रस्ते चकाचक झाल्याने, आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी आयुक्तांचे आभार व्यक्त केले.
उल्हासनगर महापालिका पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे दुरुस्ती करून काही रस्त्याचे डांबरीकरण करते. मात्र गेल्या दोन वर्षा पासून रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी झाली नोव्हती. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था होऊन महापालिकेवर टीकेची झोळ सर्वस्तरातून झाली होती. मात्र यावेळी पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी महापालिकेने ८ कोटीच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्याचे व काहीं रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम महापालिका बांधकाम विभागाने सुरू केले. अशी माहिती बांधकाम विभागाचे अभियंता अश्विनी आहुजा यांनी दिली. कॅम्प नं- ४ परिसरातील लालचक्की, संभाजी चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, मराठा सेक्शन, रेल्वे स्टेशनकडे जाणारे रस्ते यासह शहरातील मुख्य रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू केले. तसेच काही रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे.
कोरोना काळातील दोन वर्षात नागरिकांनी अगदी साध्या पद्धतीने जयंती साजरी केली होती. मात्र यावर्षी नागरिकांत मोठा उत्साह असून जयंती धुमधडाक्यात साजरी होणार आहे. मिरवणूक निघते ते रस्तेही चकाचक झाल्याने, नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. मात्र डांबरीकरण झालेले रस्ते व भरलेले रस्त्यातील खड्डे उखडत असल्याने, पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे झाले. डांबरीकरण करते वेळी डांबर कमी व ऑइल जास्त वापरल्याची टीका होत आहे