अंबरनाथमध्ये बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:14+5:302021-07-07T04:50:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : बुलेटच्या कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरवर आज अंबरनाथमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : बुलेटच्या कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरवर आज अंबरनाथमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १५० पेक्षाही जास्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून त्यांचा चक्काचूर करण्यात आला. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
बुलेट गाडीला कंपनीने दिलेला सायलेन्सर काढून अनेक जण कर्णकर्कश आणि कानठळ्या बसवणारा सायलेन्सर लावतात. या सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याची तक्रार हिराली फाउंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी केली होती. त्याची दखल घेत कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये बुलेटच्या सायलेन्सरवर ही कारवाई सुरू करण्यात आली होती. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात वाहतूक शाखेने कारवाई करत नाकाबंदीदरम्यान १५० पेक्षा जास्त बुलेटचे सायलेन्सर कापून जप्त केले होते. तर अनेक गाड्यांचे प्रेशर हॉर्नसुद्धा जप्त करण्यात आले होते. या सगळ्यावर मंगळवारी अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर कारवाई करण्यात आली. साईबाबा नाक्याजवळ हे सगळे सायलेन्सर रस्त्यावर ठेवून त्यावरून रोडरोलर फिरवण्यात आला.
या कारवाईवेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहायक पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड, अंबरनाथ विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, उल्हासनगर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईवेळी बघ्यांनीही गर्दी केली होती. मॉडिफाइड सायलेन्सरवर सुरू असलेल्या या कारवाईत आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त सायलेन्सरवर रोड रोलर फिरवला असून यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
-------------------------------------------