इमानदारीचा ‘रस्ता’ पुरात गेला नाही वाहून, उत्तम कामामुळे खड्डे पडले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 12:49 AM2019-08-18T00:49:05+5:302019-08-18T00:49:18+5:30
दि. २७ जुलै रोजी आलेल्या महापुरात ज्या रस्त्याच्या बाजूला महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती, त्या चामटोली ते कासगाव रस्त्यावर तीन दिवस पाणी साचले होते.
- पंकज पाटील
अंबरनाथ : सध्या रस्त्यांवरील खड्डे हे टीकेचा विषय झाले असून मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याचे डांबर वाहून गेल्याने रस्त्यांना खड्डे पडतात, असे सरधोपट कारण बहुतांश महापालिकांचे प्रशासन, रस्ते कंत्राटदार देत आहेत. मात्र, रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला असेल, तर तीन दिवस पुराच्या पाण्याखाली असलेल्या रस्त्याला एकही खड्डा पडत नाही, हे बदलापूर-कर्जत दरम्यानच्या रस्त्याने सिद्ध केले आहे.
दि. २७ जुलै रोजी आलेल्या महापुरात ज्या रस्त्याच्या बाजूला महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती, त्या चामटोली ते कासगाव रस्त्यावर तीन दिवस पाणी साचले होते. तीन दिवस रस्ता पाण्याखाली असतानाही त्या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. बदलापूर-कर्जत दरम्यानच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. या रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य राखला गेल्याने या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. त्यामुळे एवढ्या प्रलयानंतरही हा रस्ता वाहतुकीसाठी आजही सुरळीत सुरू आहे.
कल्याण-बदलापूर-कर्जत राज्य महामार्गाचे काम पूर्ण होऊन सहा वर्षे उलटली असून या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले होेते. बदलापूर ते कर्जत हा मार्ग वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत होता. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. या दुरुस्तीचे काम सुरू असताना कामाचा दर्जा योग्य राखला गेल्याने आजही हा रस्ता सुस्थितीत आहे. कामाचा दर्जा उत्तम राखणे, याचा अर्थ अस्फाल्टचे प्रमाण योग्य असणे, खडी चांगल्या दर्जाची वापरणे, पावसाच्या पाण्यामुळे डांबर सुटून बाहेर येऊ नये, याकरिता वापरण्यात येणाऱ्या रसायनांचे प्रमाण योग्य प्रमाणात वापरणे आदी बाबींची काळजी घेणे, हे होय. त्यामुळेच वांगणी ते बदलापूरपर्यंतचा रस्ता आजही टिकून राहिला आहे. महापुरात हा रस्ता पूर्ण पाण्याखाली आला होता. चामटोली ते कासगाव हा रस्ता तर तीन दिवस पाण्याखाली होता.
नदीचा प्रवाह वेगाने या रस्त्यावरून वाहत असतानाही हा रस्ता टिकून राहिला. हाच या रस्त्याची बांधणी उत्तम दर्जाची झाल्याचा पुरावा आहे. एवढा मोठा पूर सहन केल्यावरही या रस्त्यावर खड्डे पडले नाहीत, हा विषय या परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र, बदलापूर-कर्जत रस्ता हा नेमका त्याच्या दर्जामुळे चर्चेत आला आहे. पुण्याच्या दिशेकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर अनेक वाहनचालक करतात.
पूर्वी हा रस्ता खराब असल्याने नागरिक शीळफाटा किंवा तळोजामार्गे पुण्याकडे जात होते. मात्र, आजही बदलापूर-कर्जत रस्ता सुस्थितीत असल्याने अनेक वाहनचालक याच रस्त्यावरून मार्गक्रमण करणे सुरक्षित समजत आहेत.
बदलापूर-कर्जत रस्त्याचे काम करताना पावसाचे पाणी रस्त्यावर थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. रस्त्याला योग्य ठिकाणी उतार दिल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत नाही. मात्र, तीन दिवस पाण्याखाली राहूनदेखील हा रस्ता कोठेच खचलेला नाही किंवा रस्त्याला खड्डे पडलेले नाहीत. डांबरी रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य ठेवल्यास रस्ता टिकतो, हे या रस्त्याकडे पाहिल्यावर निश्चित कळते.
- किसन कथोरे, आमदार, भाजप