वरसावे जेट्टीचा रस्ता, नागरी सुविधांच्या कामास सीआरझेडची मंजुरी; जलवाहतुकीचे मध्यवर्ती केंद्र ठरणार
By धीरज परब | Published: October 31, 2023 07:11 PM2023-10-31T19:11:34+5:302023-10-31T19:11:45+5:30
Mira Road: वरसावे नाका येथील खाडी किनारी प्रवासी वाहतुकीच्या जेट्टी साठी रस्ता व नागरिकांच्या विरंगुळा व सुविधेसाठीच्या कामांना सीआरझेड प्राधिकरणाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे .
मीरारोड - वरसावे नाका येथील खाडी किनारी प्रवासी वाहतुकीच्या जेट्टी साठी रस्ता व नागरिकांच्या विरंगुळा व सुविधेसाठीच्या कामांना सीआरझेड प्राधिकरणाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे . सदर घोडबंदर - वरसावे जेट्टी हि जलवाहतुकीचा पर्याय व व मध्यवर्ती केंद्र ठरणार असे ते म्हणाले.
वरसावे नाका हा घोडबंदर मार्ग - ठाणा व राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबईला रस्ते मार्गाने जोडणारे मुख्य जंक्शन आहे . त्याच प्रमाणे जलवाहतुकी द्वारे मीरा भाईंदर , वसई - विरार , ठाणे , नवी मुंबई व मुंबई आदी शहरे जोडण्यासाठी येथील खाडी किनारी जेट्टी आधीच विकसित कारण्यात आली आहे . मात्र जेट्टी कडे जाणारा १२ मी रुंद रस्ता , तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी , प्रवाश्याना बसण्यासाठी शेड, पार्किंग एरिया अशा सुविधा तयार केल्या जाणार आहेत. परिसरात उद्यान तयार करून सुशोभीकरण , लहान मुलांना खेळण्यासाठी जागा , कॅफेटेरिया सुद्धा प्रस्तावित आहे.
मेरी टाइम बोर्डाने विविध कामांना परवानगी देऊन मीरा भाईंदर महापालिकेने देवगिल निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती . मात्र सीआरझेड प्राधिकरणाची परवानगी प्रलंबित होती . आता सीआरझेड परवानगी मिळाल्याने १० कोटी निधी खर्च करून जेट्टी परिसरातील सोयी सुविधा निर्मितीचे काम लवकरच सुरु होईल. पुढील वर्षाच्या पावसाळ्या आधी हि सर्व कामे पूर्ण केली जातील असे आ. सरनाईक म्हणाले.
घोडबंदर - वरसावे प्रवासी जेट्टी हि जल वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र ठरणार आहे . मीरा भाईंदर , मुंबई , वसई - विरार , ठाणे आदी प्रमुख शहरांना जोडणारी हि मध्यवर्ती जेट्टी असून नागरिकांना जल वाहतुकी द्वारे काही मिनिटात पोहचता येणार आहे . नागरिकांना जल वाहतुकीचा चांगला पर्याय मिळणार आहे . गेली दोन वर्ष याचा पाठपुरावा चालवला होता . यामुळे रस्ता , रेल्वे वरचा ताण कमी होईल अशी आशा आ . सरनाईक यांनी व्यक्त केली .