विकास आराखड्यात रस्ता नसताना देखील खाडीत पाईप टाकून रस्ता बांधण्याचा प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 04:02 PM2021-01-07T16:02:58+5:302021-01-07T16:05:43+5:30
Mira Bhayander : दहिसर व मीरारोड दरम्यान असलेल्या जाफरी खाडीचे पात्र व परिसर विस्तीर्ण असून दाट कांदळवन आहे
मीरारोड - मीरा भाईंदरच्या विकास आराखड्यात पेणकरपाड्यातील खोडियार चाळीपासून दहिसरच्या एन. एल. संकुलास जोडणारा रस्ता विकास आराखड्यात नसताना पालिकेने चक्क सदर रस्त्याच्या नावाखाली खाडी पात्रात पाईप टाकून रस्ता बांधण्याचा प्रकार चालवल्याचा भोंगळपणा उघडकीस आला आहे.
दहिसर व मीरारोड दरम्यान असलेल्या जाफरी खाडीचे पात्र व परिसर विस्तीर्ण असून दाट कांदळवन आहे. गेल्या काही काळात कांदळवनची तोड व भराव करण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. दरम्यान पेणकरपाड्यातील सरकारी जागेत तसेच पालिकेच्या उद्यानाच्या आरक्षणात झालेल्या खोडियार चाळींच्या लगत ते खाडी पात्र ओलांडून पलीकडे मुंबईच्या हद्दीतील दहिसरच्या एन एल कॉम्प्लेक्स ला जोडणारा रस्ता बांधायचा प्रस्ताव पालिकेने केला. त्यासाठी चक्क खाडीच्या प्रवाहात पाईप टाकून त्यावर भराव करून रस्ता बांधण्याचे १९ लाखांचे कंत्राट पालिकेने गजानन कंस्ट्रक्शनला दिले आहे. महापौर ज्योत्सना हसनाळे व भाजपा नगरसेवकांनी त्याचे भूमिपुजन केले होते.
सदर ठेकेदाराने देखील खाडी पात्रात पाईप टाकून त्यावर भराव केला आहे. परंतु रस्ता बांधून अजून तो मुंबईला जोडण्याचे काम थांबले आहे. वास्तविक मीरा भाईंदर शहराच्या मंजूर विकास आराखड्यात येथील खोडियार चाळ ते एन एल कॉम्प्लेक्स ला जोडणारा कोणताच रस्ता नाही आहे. तर सदर रस्ता झाल्यास पेणकरपाडा गावातून वाहनांची वर्दळ प्रचंड वाढून मोठी कोंडी होणार आहे.
त्यातच खाडी पात्रात पाईप टाकून त्यावर भराव करून रस्ता बांधण्याच्या पालिकेच्या कारभारा बद्दल टीकेची झोड उठली आहे. कारण सदर खाडी पात्र असून पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगर - जंगलातून मोठ्या प्रमाणात येणारे पाणी तसेच परिसरातील दहिसर व मीरा भाईंदरच्या हद्दीतील पाणी ह्याच खाडी पात्रातून पुढे जाते. त्यामुळे खाडीपात्रात चक्क पाईप टाकून भराव करण्याचा पालिकेचा भोंगळपणा परिसरात पुरस्थितीला कारणीभूत ठरणार असल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे. ह्या बाबत पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित, कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सोमनाथ पवार ( स्थानिक रहिवासी व प्रभाग समिती सदस्य ) - सदर रस्ता विकास आराखड्यात नाही . रस्ता बांधल्यास पेणकरपाडा गावात प्रचंड वाहतूक कोंडी होईल. शिवाय खाडीपात्रात पाईप टाकून भराव केल्यास पावसाळ्यात पूरस्थिती होईल. त्यामुळे सदर रस्त्यास आपण विरोध केला असून प्रभाग समितीच्या बैठकीत सदर काम बंद केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.