रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:45 AM2020-08-01T01:45:18+5:302020-08-01T01:45:21+5:30
मीरा-भार्इंदर पालिका : ३० टक्के जास्त दराने दिले होते कंत्राट
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : यूटीडब्ल्यू पद्धतीने कमी खर्चात व कमी वेळेत रस्त्याचे काम होत असताना मीरा-भार्इंदर महापालिकेने त्याच पद्धतीच्या नावाखाली रिद्धीका एंटरप्रायझेस या कंत्राटदारास तब्बल ३० टक्के जास्त दराने म्हणजे तीन कोटी ७१ लाखांना काम दिले. सहा महिन्यांच्या कामाला दीड वर्ष व्हायला आले, तरी काम रखडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अवास्तव दर, कामाला विलंब आणि निकृष्ट असल्याच्या गंभीर तक्रारींवर कारवाई करण्यास महापालिका टाळाटाळ करत आहे.
प्रफुल्ल पाटील चौक ते विमल डेअरीपर्यंतचा रस्ता यूटीडब्ल्यूटी पद्धतीने करण्याच्या कामाचे कंत्राट ८ मार्च २०१९ ला रिद्धीका एंटरप्रायझेस या कंत्राटदारास दिले होते. पालिकेच्या अंदाजपत्रकानुसार या कामाची निविदेतील अंदाजित रक्कम दोन कोटी ८५ लाख ८८ हजार ६२७ रुपये इतकी होती. परंतु, पालिकेने कंत्राटदारास हे काम तब्बल २९.९० टक्के जास्त दराने म्हणजेच तीन कोटी ७१ लाख ३६ हजार इतक्या किमतीला दिले आहे. या कामाची मुदत सहा महिन्यांची म्हणजेच ७ सप्टेंबर २०१९ पर्यंतची असताना दीड वर्ष झाले तरी काम अजून अपूर्णच आहे. पालिका मात्र सोयीस्कर भूमिका घेत कंत्राटदाराला पाठीशी घालत मुदतवाढ देत आहे. सुरक्षा अनामत रक्कम पाच टक्के घ्यायची असताना केवळ तीन टक्केच घेतली. मुळात कंत्राटदारास या कामाचा अनुभव नसताना काम दिले, अशा तक्रारी आहेत.
रस्ता खणून ठेवल्याने नागरिकांना येजा करणे जिकिरीचे बनले होते. धूळ व खडीतील पावडरने त्रासले होते. आताही ठिकठिकाणी काम अपूर्णच आहे. पालिका अधिकारी व तांत्रिक सल्लागार जागेवर नसताना कंत्राटदाराने काम सुरू केले आहे. गटारांतील सांडपाणी कामासाठी वापरले असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते इरबा कोनापुरे व प्रवीण परमार यांनी पालिकेसह सरकारकडे केली आहे. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी या दोघांनी केली आहे.
कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे दीड वर्ष झाले, तरी काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कंत्राटदारावर कारवाई करून कंत्राट रद्द करावे. निविदा व कामाची चौकशी केली पाहिजे.
- तारा घरत, नगरसेविका
याबाबतच्या आलेल्या तक्रारींची शहानिशा केली जाईल. त्यानुसार, आवश्यक असेल ती कार्यवाही केली जाईल.
- शिवाजी बारकुंड,
शहर अभियंता, भार्इंदर मनपा