ठाण्यात १८३ कोटींचे रस्त्यांचे काम अद्याप कागदावरच! कोट्यावधी खर्च करूनही ठाणेकरांच्या नशीबी खड्डेमय रस्ते!

By अजित मांडके | Published: August 24, 2022 12:09 PM2022-08-24T12:09:36+5:302022-08-24T12:10:31+5:30

Thane : तीन महिन्यांपूर्वी १८३ कोटीं मंजूर होऊनही  शहरातील १२७ रस्त्यांमधील बहुतेक रस्त्यातील कामाला अद्यापही सुरूवात झालेली नसल्याची माहिती मनसेचे जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणली आहे.

Road work worth 183 crores in Thane is still on paper! Even after spending crores, the fate of Thanekar's potholed roads! | ठाण्यात १८३ कोटींचे रस्त्यांचे काम अद्याप कागदावरच! कोट्यावधी खर्च करूनही ठाणेकरांच्या नशीबी खड्डेमय रस्ते!

ठाण्यात १८३ कोटींचे रस्त्यांचे काम अद्याप कागदावरच! कोट्यावधी खर्च करूनही ठाणेकरांच्या नशीबी खड्डेमय रस्ते!

Next

ठाणे : केवळ ठाणे शहरातील रस्ते खराब असल्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या खड‌्डयांमुळे वाहनचालकाचा जाणारा नाहक बळी असो, खड्ड्यांमुळे वाहतूक संतगतीने झाल्यामुळे तासंतास नागरिकांना वाहतूक कोंडीचा करावा लागणारा सामना असो किंवा वाहनचालकांना खड्ड्यांमुळे झालेला मणक्याचा त्रास असो तर कधी रूग्ण नेताना अॅम्ब्युलन्सला करावी लागणारी कसरत असो या खराब रस्त्यांचा परिणाम थेट ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनावर होत असतानाही रस्त्यांच्या बाबतीत अजूनही प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते. 

तीन महिन्यांपूर्वी १८३ कोटीं मंजूर होऊनही  शहरातील १२७ रस्त्यांमधील बहुतेक रस्त्यातील कामाला अद्यापही सुरूवात झालेली नसल्याची माहिती मनसेचे जनहित विधी विभागचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजेच सदर कामात  ठेकेदारास सबकॉन्ट्रॅक्टर देण्यास पात्र असल्यामुळे रस्त्यांचा कामाचा  दर्जा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान अवघ्या एक आठवड्यावर येऊ ठेपलेल्या बाप्पाचे स्वागतही ठाणेकरांना या खड्डेमय रस्त्यातूनच करावे लागणार आहे.

शहरातील रस्ते हे त्या शहराचा विकास सांगते, मात्र ठाण्यातील रस्त्यांची दुरावस्था पाहता शहर विकाच्या उलट्  दिशेन प्रवास करत असल्याचे चित्र आहे. ठाण्याचेच मुख्यमंत्री असतानाही अजून ठाण्यातील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न सोडविला जात नाही. ठाण्यातील रस्त्यांची अवस्था सुधारावी, यासाठी नगर विकास विभागाच्या वतीने ठाणे महापालिकेला १८३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निधी अंतर्गत ठाण्यातील महत्त्वांच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये सिमेंट काँक्रिट, डांबरीकरण आणि यु टी डब्लू टी पद्धतीने रस्ते करण्याच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या. 

ठाण्यातील १२७ रस्त्यांमध्ये ८४ रस्त्यांचे यु टी डब्लु टी, १२ रस्त्यांचे सिमेंट काँक्रिट पद्धतीने तर ३४ रस्त्यांचे डांबरीकरणच्या माध्यातून रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये उड्डणपुलावरील रस्त्यांचाही समावेश आहे. यासाठी सबंधीत ठेकेदाराला जून २०२२ मध्ये आदेशही देण्यात आला आहे. पण यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे हे संपूर्ण काम फक्त दोन ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येणार असून निविदेमध्ये ठेकेदार त्याचे काम दुसऱ्या ठेकेदाराला म्हणजेच सबकॉन्ट्रॅक्टला देण्यास पात्र असल्यामुळे कामाचा दर्जा कमी होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, डांबरीकरणाच्या कामासाठी ७१ कोटी ९४ लाख ८६ हजार ०८४ आणि यु टी डब्लु टी साठी ८१ कोटी २४ लाख ६१ हजार ७६८ आणि सिमेंट काँक्रिट रस्त्यांसाठी ३० कोटी ८० लाख ५६ हजार ४८७ असे १८३ कोटी महापालिकेच्या वतीने रस्त्यांवर खर्च करण्यात येणार आहे

'... तर तीव्र आंदोलन करण्यात येईल'
गेल्या चार महिन्यांपासून ठाणेकरांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. खड्ड्यांमुळे जीव गेल्याच्या घटनाही असताना प्रशासनाला जाग येत नाही. तरी या सर्व रस्त्यांचे काम त्वरीत पूर्ण करून ठाणेकरांना खड्डेमुक्त शहर करावे व तसे न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसेचे जनहित विधी विभाग

Web Title: Road work worth 183 crores in Thane is still on paper! Even after spending crores, the fate of Thanekar's potholed roads!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे