गायमुख घाटातील रस्त्याच्या कामामुळे ठाण्यात वाहतूक कोंडीचा फटका
By जितेंद्र कालेकर | Published: June 6, 2024 06:34 PM2024-06-06T18:34:01+5:302024-06-06T18:34:21+5:30
ठाणे ते बोरीवली आणि बोरीवली ते ठाणे मार्गावर वाहनांचा खोळंबा: पाच मिनिटांसाठी दीड ते दोन तास
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणाºया मार्गावर गायमुख घाटात ७०० मीटर रस्त्याच्या मजबूतीकरण्याचे काम २४ मे पासून सुरु केले आहे. याच कामामुळे घोडबंदर मार्गांवर गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. बोरिवली कडे जाण्याच्या तसेच ठाण्याकडे येण्याच्या अशा दोन्ही मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशाना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.
विशेष म्हणजे वाहतूक शाखेने या मार्गावर या कामामुळे आधीच मोठया वाहनाची वाहतूक बंद केली आह. तरीही काही वाहने या मार्गाने जात असल्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचेही पहायला मिळाले.
गायमुख घाट २४ मे २०२४ पासून अवघड वाहनांसाठी बंद केला आहे. मुंबई अहमदाबाद ला जोडणाºया घोडबंदर रोडवर गायमुख घाट रस्त्याचे डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेतले आहे. या महामार्गावरील ७०० मीटर रस्त्याचे सॉईल स्टॅबिलायझेशन करून मजबूतीकरण केले जात आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मार्गावरील वाहतूकीमध्ये बदल केले असून २४ मे ते ७ जूनपर्यंत या मार्गावर मोठया मालवाहू वाहनांना बंदी घातली आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मोठया वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहनही वाहतूक शाखेने केले आहे.
अवघ्या पाच मिनिटांसाठी दीड तास-
गुरुवारी झालेल्या कोंडीमुळे अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी चालकांना दीड ते दोन तासाचा कालावधी लागत होता. दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी सकाळी बोरिवलीकडे जाण्याºया आणि ठाण्याकडे येणाºया अशा दोन्ही मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाली होती.दुपारी एक वाजेपर्यंत ही कोंडी कायम होती. महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळीही या वाहतूक कोंडीला चालकांना सामोरे जावे लागले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक मदतनीस आणि वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. बोरिवलीच्या दिशेने जाणाºया मार्गांवर ठाण्यात कासारवडवली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहन चालकांनी त्यांची वाहने रस्त्यावर बंद केल्याने या वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडली.