टिटवाळा फाटकातील रस्त्याची डागडुजी; वाहतूककोंडी टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:43 AM2019-12-13T01:43:18+5:302019-12-13T01:43:21+5:30
वाहनचालकांनी व्यक्त केले समाधान
टिटवाळा : टिटवाळा रेल्वे फाटकातील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘टिटवाळा रेल्वे फाटकात वाहतूक कोंडी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये सोमवारी वृत्त प्रसिद्ध होताच रेल्वे प्रशासनाने मंगळवारी रस्त्याची डागडुजी करत तो चकाचक केला. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
टिटवाळा रेल्वे फाटकातील रस्ता हा अनेक दिवसांपासून खराब झाला होता. त्यातील खडी, दगडे वर आली होती. त्यामुळे या रस्त्यावरून दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना घडत होत्या. तसेच तेथील उंच सखल भागांमुळे अनेक मोटारी, रु ग्णवाहिका, स्कूलबस, मालवाहू ट्रक अडकत असल्याने फाटक जास्त वेळ उघडे राहत होते. त्याचा फटका रेल्वेच्या वेळापत्रकाला बसत होता. त्यामुळे नागरिकांतून रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत होती.
शिवसेनेचे कल्याण उपशहर प्रमुख शिवसेना किशोर शुक्ला आणि अनिल महाजन यांनीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. तसेच ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती केली.