पादचारी पुलाकरिता ‘रस्ताब्लॉक’
By admin | Published: April 11, 2016 01:28 AM2016-04-11T01:28:10+5:302016-04-11T01:28:10+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावर पादचारी उड्डाण पुलाचा ६० मीटर लांबीचा सांगाडा बसविण्यासाठी शनिवारी रात्री घेतलेला १४ तासांचा ब्लॉक यशस्वी झाला आहे.
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर पादचारी उड्डाण पुलाचा ६० मीटर लांबीचा सांगाडा बसविण्यासाठी शनिवारी रात्री घेतलेला १४ तासांचा ब्लॉक यशस्वी झाला आहे. यामुळे सर्वाधिक लोकांचा वावर असलेल्या विवियाना मॉलकडे जाण्याकरिता आता रस्ता ओलांडण्याची गरज लागणार नाही व पर्यायाने अपघात होणार नाहीत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ (मुंबई-नाशिक महामार्ग) येथे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी विवियाना मॉलसमोर पादचारी उड्डाण पुलाचे काम शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी १० वा.च्या सुमारास हाती घेण्यात आले होते. यासाठी तयार केलेला ६० मीटर लांबीचा लोखंडी सांगडा ठेवण्याच्या कामासाठी १२ तासांचा ब्लॉक जाहीर केला होता. या कामासाठी नियोजित वेळेपेक्षा अधिक दोन तास अधिक लागले.
या दरम्यान, महामार्गावरील कॅडबरी उड्डाण पूल ते माजिवडा उड्डाणपुलाची वाहतूक अन्यत्र वळवली होती. मुंबईकडून नाशिक-घोडबंदर मार्गाकडून जाणारी वाहने कॅडबरी ब्रीजवर न चढता नितीन, कॅडबरी जंक्शन येथून सर्व्हिस रोड तसेच घोडबंदर नाशिक मार्गे तर मुंबई दिशेने जाणारी वाहने माजिवडा व कापुरबावडी उड्डाण पुलाचा वापर न करता गोल्डन डाईज जंक्शन, संकल्प हाईस्ट सर्व्हिस रोड मार्गावर वळण्यात आली होती. वाहनांची गर्दी असलेल्या महामार्गावर ब्लॉक घेतल्याने पर्यायी मार्गांवर शनिवारी रात्री व रविवारी सकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मात्र या पादचारी पुलामुळे आता रस्ता ओलांडताना होणारे अपघात कमी होतील. गेल्या काही दिवसांत भरधाव वाहतुकीचा हा रस्ता ओलांडताना अनेकजण मृत्यूमुखी पडले तर काही जखमी झाले.
रविवारी सकाळी या मार्गावर अवजड वाहनांव्यतिरिक्त हलकी वाहने नेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ८.३० ते ९ वाजल्यापासून वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. ती कोंडी दुपारी दोन वाजेपर्यंत दिसत होती. दुपारी २.१५ ते २.३० वा.च्या सुमारास वाहतूक सुरळीत सुरु झाली. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहने सर्व्हीस रोडमार्गे वळविली. (प्रतिनिधी)