खड्ड्यांनी केली रस्त्यांची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:42 AM2021-07-28T04:42:08+5:302021-07-28T04:42:08+5:30
ठाणे : पावसामुळे खड्डे पडून ठाणे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठे खड्डे बुजविण्यासाठी सिमेंटचा वापर केला जात असला ...
ठाणे : पावसामुळे खड्डे पडून ठाणे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठे खड्डे बुजविण्यासाठी सिमेंटचा वापर केला जात असला तरी, पावसाने हे सिमेंट वाहून जात आहे. त्यामुळे पुन्हा खड्डेच खड्डे होत आहेत. घोडबंदर भागातील सेवा रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वीच करण्यात आली होती. परंतु या रस्त्यांवरील डांबर वाहून जाऊन खड्डे पडले आहेत. महापालिकेच्या आकडेवारीनुसार १५७१ खड्डे असून, त्यातील १३८२ खड्डे भरल्याचा दावाही पालिकेने केला आहे. आता केवळ २८९ खड्डे भरणे शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिकेचा हा दावा शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता फोल असल्याचे दिसत आहे.
पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्त्यांची अवस्था : वाईट झाली आहे. शहरातील मानापाडा, पातलीपाडा येथील सेवारस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वीच या सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. परंतु पावसाने या खर्चावर पाणी फेरले आहे. नितीन कंपनी, तीनहात नाका, तसेच येथील सेवा रस्ता, कळवा, नौपाडा, मल्हार सिनेमाजवळील रस्ता, तसेच वागळे इस्टेट भागातील बहुतेक रस्त्यांवर खड्डे आहेत. दिव्यातही हीच परिस्थिती आहे. केवळ महापालिकाच नाही तर एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या उड्डाणपुलांवरदेखील खड्डेच खड्डे झाले आहेत. महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी २.२५ कोटींचा निधी खर्च करण्याचे निश्चित केले आहे. भरपावसातही पालिकेने खड्डे बुजविण्याचे काम केले होते. परंतु, पावसाच्या पाण्याने हे भरलेले खड्डेही वाहून गेल्याचे चित्र शहराच्या विविध भागात दिसत आहेत.
ठाणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात १५७१ खड्डे होते. त्यातील १३८२ खड्डे भरल्याचा दावा करण्यात आला आहे. आता केवळ २८९ खड्डेच भरणे शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात एका एका रस्त्यावर ५० हून अधिक खड्डे आहेत. त्यामुळे पालिकेचा हा दावा कितपत खरा आहे, याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
प्रभाग समिती - खड्डे - बुजविण्यात आलेले खड्डे - शिल्लक खड्डे
नौपाडा कोपरी - ११२ - १७० - ४२
उथळसर - २२१ - २११ - १०
कळवा - १२५ - ११७ - ८
मुंब्रा - १९३ - १३७ - ५६
वागळे - ८७ - १८ - ६९
वर्तकनगर - ४०५ - ३७० - ३५
दिवा - १९६ - १४८ - ४८
माजिवडा-मानपाडा - १३३ - १२० - १३
लोकमान्य- सावरकरनगर - ९९ - ९१ - ११
---------------------------------------------------------------------------------------
एकूण - १५७१ - १३८२ - २८९