शहरामधील रस्ते ‘खड्ड्यांत’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:26 PM2019-11-04T23:26:20+5:302019-11-04T23:26:35+5:30
उल्हासनगरातील नागरिकांचा खड्ड्यांतूनच प्रवास : लाखो रुपयांचा खर्च गेला पाण्यात
उल्हासनगर : पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्तीच न झाल्याने शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. नगरसेवक, नागरिकांनी ओरड केल्यानंतर ऐन पावसात रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ५० लाखांच्या निधीला आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र, खड्ड्यांमध्ये विटा, दगडमातीचा भराव करून केवळ मलमपट्टी केल्याने प्रश्न सुटण्याऐवजी हे रस्तेच निसरडे झाले. त्यानंतर, केलेले डांबरीकरणही निघाल्यामुळे सर्वच रस्ते पुन्हा मूळ पदावर आले आहेत.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान कोल्ड आणि हॉट मिक्सचा प्रयत्न फसल्यानंतर प्रत्येक प्रभागातील मुख्य चार रस्त्यांचे डांबरीकरण आणि खड्डे भरण्यासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद करून रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट होऊ न नव्याने घातलेले डांबर निघून गेल्याने महापालिकेच्या रस्तादुरुस्तीवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
महापालिकेचा रस्त्यातील खड्डे भरण्याचा व डांबरीकरण करण्याचा प्रयोग फसल्यानंतर स्थायी समितीने मंजूर केलेल्या वाढीव निधीतून रस्त्याची दुरुस्ती सुरू केली. यावर किती निधी खर्च झाला, याची कल्पना बांधकाम विभागाचे प्रभारी शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांना नसल्याचे उघड झाले. एकूणच बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. यापूर्वीही बांधकाम विभाग अनेकदा वादात सापडला आहे. शितलानी यांच्या हकालपट्टीची मागणी सुरू झाली असून आयुक्त देशमुख काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यांमध्ये साचून राहिलेले पाणी यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरातून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, शहरातील रस्त्यांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊ न रस्त्यांची वस्तुस्थिती मांडली. यानंतर आयुक्तांनी रस्त्यांच्या दुरुस्तीचे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.
बहुतांश रस्त्यांची झाली दुरवस्था
शहरातील कॅम्प नं. ४, मोर्यानगरी, नेताजी चौक ते कालीमाता चौक, स्टेशन रोड रस्ता, व्हिनस चौक ते एसएसटी कॉलेज रस्ता, खेमानी रस्ता, हिराघाट रस्ता, कॅम्प नं. ३ येथील शांतीनगर ते डॉल्फिन हॉटेल रस्ता, गुलशननगर रस्ता, जुना बसस्टॉप रस्ता, व्हिनस चौक ते एसएसटी कॉलेज रस्ता, सुभाष टेकडीतील रस्ते आदी अनेक रस्ते खड्डेमय झाले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे लहानेमोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.