रस्ते खोदकामांमुळे नागरिक त्रस्त; विविध कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:32 PM2020-01-03T23:32:29+5:302020-01-03T23:32:32+5:30
पावसाळ्यात झाली होती चाळण
मीरा रोड : लांबलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांच्या चाळणीनंतर खड्डे भरून रस्ते सुस्थितीत करण्याचे काम पूर्ण होत नाही, तोच आता विविध कामांसाठी शहरातील रस्त्यांवर खोदकामे केली जात आहेत. पावसाळ्यातील खड्ड्यांपासून शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असताना या खोदकामांमुळे पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मीरा-भार्इंदर महापालिका आणि बहुतांश नगरसेवकांच्या रस्ते, गटारे आदी विविध बांधकामांमधील कारभाराचा प्रत्यय नागरिकांना नवीन नाही. रस्त्याच्या कामाचा दर्जा व समतोलपणा नसल्याने पावसाळा सुरू होत नाही, तोच शहरातील रस्ते खड्ड्यांत जातात. रस्त्यांची पार चाळण होते. या खड्ड्यांमुळे पादचारी व वाहनचालकांचा जीव टांगणीला लागतो. खड्डे चुकवत चालणे म्हणजे दिव्यच असते. यंदा खड्ड्याने एका तरुणाचा बळी घेतला आहे.
पावसाळा लांबल्याने यंदा तर खड्ड्यांचा जाच शहरवासीयांना अगदी आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सोसावा लागला. आजही काही ठिकाणी खड्डे कायम आहेत. त्यातच, ज्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले वा नव्याने डांबरीकरण केले, ते रस्ते विविध कामांसाठी पुन्हा खोदून ठेवले आहेत. अदानी पॉवर, महानगर गॅस, जीओ-एमटीएनएल आदींच्या केबल टाकणे तसेच पालिकेचे नाले, नळजोडण्या आदींची कामे करण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत.
शहरातील बहुतांश रस्त्यांवर खोदकामे सुरू केली असून काशिमीरा ते सावरकर चौकापर्यंतच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावर मेट्रोसाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामांमुळे वाहतूककोंडी होते. पादचारी नागरिकांना चालणे जिकिरीचे झाले आहे. शहरातील रस्ते, पदपथावर आधीच बेकायदा वाहन पार्किंग, फेरीवाले, टपऱ्यांचे अतिक्रमण, गॅरेज, कार शोरूम आदींनी रहदारी व वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर महापालिका आणि नगरसेवकांकडून डोळेझाक केली जात असताना रस्ते खोदून ठेवल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना तर जीव मुठीत धरून चालावे लागते. तर, धुळीच्या त्रासाने नागरिक बेजार झाले आहेत.
कंत्राटदाराला दिलेले पैसे वाया
खड्डे खोदकामाच्या ठिकाणी होणारी दिरंगाई, पसरवून ठेवली जाणारी माती आणि वाहतुकीच्या नियमासह सुरक्षिततेची न घेतली जाणारी काळजी यामुळे खोदकाम धोकादायक ठरत आहे. नुकतेच खड्डे भरून वा नव्याने डांबरीकरण करून झाल्यावर पुन्हा खोदकाम हाती घेतल्याने यात कंत्राटदाराला दिलेले पैसे खड्ड्यांत गेले आहेत. कारण, पुन्हा खोदकाम केल्याने खड्डे भरावे लागणार असून त्याचा दर्जा व समतोल राखला जात नसल्याने रस्ता खचत असल्याचा नित्याचा अनुभव आहे. एकूणच महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत.