कल्याण-डोंबिवलीतील रस्ते दिवाळीतही खड्ड्यांत; जीवघेण्या खड्ड्यांकडे केडीएमसीचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 11:21 PM2019-10-27T23:21:01+5:302019-10-27T23:21:26+5:30
मागील वर्षी खड्ड्यांनी चार जणांचे बळी घेतले होते. यंदा पत्रीपुलाकडून कल्याण पश्चिमला येणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीवरील अरुण महाजन यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कल्याण : गणेशोत्सव, दसरा आणि आता दिवाळीतही कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश रस्ते अद्याप खड्डेमय स्थितीत आहेत. बेभरवशाच्या पावसाचा रस्तेदुरुस्तीच्या कामांना फटका बसला आहे. यात जीवघेण्या खड्ड्यांनी वाहनचालकांचा प्रवास धोक्याचा झाला आहे. हे खड्डे तरी तातडीने बुजवा, अशी मागणी होत आहे.
मागील वर्षी खड्ड्यांनी चार जणांचे बळी घेतले होते. यंदा पत्रीपुलाकडून कल्याण पश्चिमला येणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीवरील अरुण महाजन यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसाळ्यात रस्त्यांना पडणारे खड्डे कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नवीन नाहीत. पण, यंदा पाऊस लांबल्याने तर सद्यस्थितीला पडणारा बेभरवशाच्या पावसाने रस्ते दुरुस्तीच्या कामांना ब्रेक लागला आहे. गणेशोत्सवात खड्ड्यांचा त्रास कायम राहिला होता. यावर घटस्थापनेपूर्वी खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. पण, काही रस्त्यांवरच डांबर पडले तर बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आजही कायम राहिल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण पश्चिममधील पत्रीपूल ते शिवाजी चौक, वल्लीपीर रोड, टिळक चौक, अहिल्याबाई चौक ते आग्रा रोडला जोडणारा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तर पूर्वेकडे चिंचपाडा, कोळसेवाडी, खडेगोळवलीसह डोंबिवली पूर्वेतील ठाकुर्ली परिसरातील म्हसोबा चौक ते खंबाळपाडा रस्ता, कचोरे परिसर आणि पश्चिमेतील नवापाडा, घनश्याम गुप्ते रोड, जुनी डोंबिवली, गणेशनगर, राजूनगर येथे खड्ड्यांची खोली अधिक वाढल्यामुळे अपघात होऊन कुणी जिवानिशी जाण्याची शक्यता आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यानंतर डांबरीकरणाने पॅच मारण्याच्या कामांना प्रारंभ झाला होता. पण, पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने ही कामे पुरती खोळंबली आहेत. परिणामी, दिवाळीतही खड्डेमय स्थिती दिसत आहे.