एमआयडीसीतील रस्ते खड्ड्यांतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:58 AM2018-01-17T00:58:42+5:302018-01-17T00:58:52+5:30
एमआयडीसीतील निवासी विभागातील सर्वच रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे अजूनही कायम आहेत. खड्ड्यांमधील धुळीमुळे रहिवासी आणि वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत
डोंबिवली : एमआयडीसीतील निवासी विभागातील सर्वच रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे अजूनही कायम आहेत. खड्ड्यांमधील धुळीमुळे रहिवासी आणि वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, एमआयडीसीच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
१ जून २०१५ ला २७ गावे पुन्हे केडीएमसीत समाविष्ट झाली. त्यामुळे एमआयडीसीतील रस्त्यांच्या दुरुस्तीची नेमकी जबाबदारी कोणाची, असा यक्षप्रश्न रहिवाशांना पडला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी डोंबिवलीत आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मात्र मालमत्ताकर गोळा करणाºया केडीएमसीचीच रस्तेदुरुस्ती करण्याची जबाबदारी असल्याचे सांगत हा संभ्रम दूर केला. त्यानंतरही दुरुस्तीसंदर्भात हालचाली केडीएमसीकडून झालेल्या नाहीत. मध्यंतरी एमआयडीसीतील सेनेच्या पदाधिकºयांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना पत्र पाठवून सत्ता असूनही दुर्लक्षित आहोत, अशा शब्दांत घरचा आहेर दिला होता. तसेच पाठपुरावा करूनही परिस्थितीत सुधारणा होत नाही. सत्ताधारी म्हणून नागरिकांच्या रोषाला आम्हाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. जर याबाबतीत तातडीने हालचाल न झाल्यास मालमत्ताकर न भरण्याचा आम्ही विचार करू, असा इशाराही या पदाधिकाºयांनी महापौरांना दिला होता. मात्र, त्यांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवली गेली.
सध्या निवासी विभागातील शेवटचा बसस्टॉप, भाजीगल्ली, मिलापनगर तलाव रोड, सुदर्शननगर, साईबाबा मंदिर रोड यासह अन्य बहुतांश रस्ते खराब आहेत. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.
यासंदर्भात केडीएमसी-डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांना संपर्क साधला असता रस्त्यांच्या काही ठिकाणी गटारांची बांधणी झालेली नाही. हे काम एमआयडीसीचे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना त्यांनी गटार बांधून दिल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तर, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे म्हणाले, रस्तेदुरुस्तीची जबाबदारी केडीएमसीची आहे. गटारबांधणीबाबत विचारले असता आपण बैठकीत व्यस्त असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.