कोट्यवधींचा खर्च करूनही रस्ते खड्ड्यातच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:43 AM2021-09-27T04:43:55+5:302021-09-27T04:43:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर प्रशासनाकडून चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर प्रशासनाकडून चार अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली गेली. कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, भिवंडी आणि इतर महानगरपालिका, नगरपालिकांमधील रस्त्यांची परिस्थिती वेगळी नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी या ठिकाणीही लक्ष दिले पाहिजे. कल्याण-डोंबिवलीतील रस्ते खड्ड्यांमध्ये हरवले आहेत. मात्र महापालिकेकडून अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जात नाही. त्यामुळे खड्डे बुजविण्यावर होणारा १५ कोटींचा खर्चही खड्ड्यातच जाणार आहे. येथील अधिकारी, ठेकेदारांची झाडाझडती कोणी घेणार की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कल्याण-गांधारी मार्गावर लस घेण्यासाठी निघालेल्या दिव्या कटारिया या महिलेचा मृत्यू खड्ड्यांमुळे झाल्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. मात्र रस्त्याच्या हद्दीचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला गेला. त्यामुळे कारवाई करायची कुणी आणि कोणावर असा संभ्रम निर्माण होऊन कोणावरच कारवाई झाली नाही. २०१८ मध्ये कल्याण-डोंबिवली हद्दीत रस्त्यामुळे एका शाळकरी मुलासह चारजणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांची पाहणी केली होती. अधिकाऱ्यांसह आयुक्तांनाही त्यांनी फैलावर घेतले होते. याबाबत अहवाल तयार करण्याचे आदेशही दिले होते. त्यावेळीही महापालिका प्रशासनाकडून थातूरमातूर अहवाल तयार करून अधिकारी वर्गास वाचविण्याचा प्रयत्न केला होता. महिन्याभरापूर्वी कल्याण मलंग रोडवर एका तरुणाचा खड्ड्यामुळे अपघात होऊन तो जखमी झाला होता. चार दिवसांपूर्वीच खड्ड्यांमुळे आणखी एक अपघात होऊन वाहनचालकाचे दात पडले होते. या घटना ताज्या आहेत. आता प्रशासन या वर्षी कारवाई करण्यासाठी आणखी किती मृत्यू होण्याची वाट पाहते, असा प्रश्न आहे. पालकमंत्र्यांनी पुन्हा कल्याण-डोंबिवलीचा दौरा करावा. कोरोनात जशी नागरिकांची काळजी घेतली, तशी रस्ते नीट होत आहेत की नाही, याचीही पाहणी करून अधिकाऱ्यांची झाडाझडती घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अंतर्गत रस्त्यांचीही चाळण झालेली आहे. त्यामुळे वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. रस्तेच नव्हे तर महापालिका हद्दीतील पुलांवरदेखील खड्डे पडले आहेत. या पुलावर गेल्याच वर्षी मास्टिक अस्फालन्टिंग शीट टाकण्यात आली होती. तीसुद्धा कुचकामी ठरली आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रवास करताना हाड, कंबरदुखीचे आजार होत आहेत. काहींना मणक्याचे आजार होत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने गेल्या वर्षी मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली. जनतेच्या कररूपी पैशांतून विकासकामे केली जातात. यंदा खड्डे भरण्यासाठी १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा पैसा जनतेचा आहे. जनतेचे १५ कोटी खर्च करुनदेखील रस्ते खड्ड्यांतच असतील तर या पैशाची उधळपट्टी कशाला करायची? गेल्या वर्षी या कामावर १७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याच्या मागच्या वर्षी १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे भरण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ३० कोटी रुपये खर्च केले गेले. कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी १७ ते १८ कोटी रुपये खर्च केले जातात. हादेखील एक विरोधाभास यानिमित्ताने समोर आला आहे.