साडेसहा कोटींची निविदा काढूनही रस्ते खड्ड्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:48+5:302021-07-08T04:26:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न केल्यामुळे शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे बुजविण्यासाठी ...

Roads in potholes despite tender of Rs 6.5 crore | साडेसहा कोटींची निविदा काढूनही रस्ते खड्ड्यांत

साडेसहा कोटींची निविदा काढूनही रस्ते खड्ड्यांत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न केल्यामुळे शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डे बुजविण्यासाठी साडेसहा कोटींची निविदा गेल्या महिन्यात काढूनही खड्डे भरण्याचे काम सुरू झालेले नाही. शहरातून जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर रस्त्यावर फाॅरवर्ड लाइन चाैक येथे माेठमाेठे खड्डे पडले आहेत. मंगळवारी या खड्ड्यांत दुचाकी आदळून एक दाम्पत्य खाली पडून गंभीर जखमी झाले. दुचाकींच्या वाढत्या अपघातांमुळे प्रशासनाबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

उल्हासनगरातील ७० टक्के रस्ते सिमेंटचे असल्याचे सांगण्यात येते, तर वर्षभरात सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार असल्याचे सत्ताधारी व महापालिका प्रशासन सांगत आहे. प्रत्यक्षात येथील रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असून, अनेक भागांत सिमेंटच्या रस्त्यांवरच पुन्हा सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू आहे. काही वर्षांपूर्वी १०० फूट रुंदीकरण केलेल्या कल्याण ते बदलापूर मुख्य रस्त्याची दैना उडाली आहे. या रस्त्यावर दररोज दुचाकी चालक पडून जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, तरीही रस्तेदुरुस्तीकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. मंगळवारच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होऊनही पालिकेला खड्डे भरण्याबाबत अद्याप जाग आलेली नाही.

पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी साडेसहा कोटींची निविदा बांधकाम विभागाने काढली. मात्र, निविदा उघडूनही खड्डे भरलेले नाहीत. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश शीतलानी यांनी पुढील आठवड्यात खड्डे भरणार असल्याची माहिती दिली. महापालिकेने रस्त्यातील खड्डे त्वरित भरले नाहीत, तर मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला. दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च करूनही रस्त्याची दैनावस्था झाल्याने संबंधित ठेकेदार व पालिका अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

चौकट

या ठिकाणी आहे खड्ड्यांचा धाेका

शहरातून जाणारा कल्याण ते बदलापूर रस्ता, नेताजी चौक ते कैलास कॉलनी, कुर्ला कॅम्प रस्ता, उल्हासनगर रेल्वे स्टेशन रस्ता ते सुभाष टेकडी रस्ता, मोर्यानगरी ते व्हिनस चौक, कॅम्प नं-२ जुना बस स्टॉप, खेमानी रस्ता, डॉल्फिन हॉटेल रस्ता, आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयासमोरील रस्ता, रमाबाई आंबेडकर, भय्यासाहेब आंबेडकरनगर रस्ता, हिराघाट रस्ता, शपवई चौक ते विठ्ठलवाडी रस्ता आदी अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Web Title: Roads in potholes despite tender of Rs 6.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.